पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्मारकार्थ आह्मी त्यांचे जे दुसरे पुस्तक प्रसिद्ध करणार आहोत, त्यांत त्यांचे ठळक ठळक टीकात्मक लेख देणार आहोत.
 हरिपंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मारकार्थ नागपुरांत खटपट होऊन बरीच रक्कम गोळा झाली आहे. आणि तिच्या व्याजांतून स्मारक कमिटी ठरवील त्याप्रमाणे नवीन अगर भाषांतररूप पुस्तक लिहिणारास एक चांगले बक्षीस देण्याचा ठराव झाला आहे. आह्मांस वाटते, पंडितांच्या स्मारकार्थ जमलेल्या रकमेचा उत्तम विनियोग ह्मणजे त्यांनी लिहिलेले लेख छापून त्यांचा प्रसार करणे हा होय. यापासून त्यांची स्मृति सदोदित लोकांच्या अंत:करणांत राहील, त्यांच्या लेखांचा त्यांच्या पिढीच्या लोकांस जसा फायदा मिळाला तसाच पुढील पिढीसही मिळेल, आणि मराठी वाङ्मयावर त्यांचे जे चिरस्मरणीय उपकार आहेत त्यांना कायमचे स्वरूप प्राप्त होईल. पुन:, या कामी जो खर्च होईल तो पुस्तकविक्रीच्या रूपाने भरून येऊन स्मारकाची रकम जशाची तशीच राहील, -कदाचित् वाढेलही, -आणि पुढे नवीन ग्रंथ तयार करून घेण्यास उपयोगी पडेल.पंडित-स्मारककमिटी या सूचनेचा योग्य विचार करील अशी आशा आहे.
 या पुस्तकांत छापिलेली चरित्रे बहुतेक मूळावरहुकूम आहेत. फक्त कै. जावजी दादाजी यांच्या चरित्रापैकी एक गोष्ट वस्तुस्थितीस सोडून असल्याचे चौकशीअंती समजल्यावरून ती गाळली आहे.
 या पुस्तकांत जी चित्रं आहेत ती आह्मांस निर्णयसागर छापखान्याचे मालक रा. रा. तुकाराम जावजी यांनी मेहरबानीने दिली. याबद्दल त्यांचे उपकार मानणे अवश्य आहे.
 शेवटी, ज्यांच्या कवितेबद्दल हरिपंतांस अत्यंत प्रेमबुद्धि असे त्या कविवर मोगऱ्यांच्या पद्यांचा प्रास्ताविक हार त्यांच्या स्मृतिपटावर वाहून हा अल्पसा प्रस्तावनालेख पुरा करितो.

नाहीं जन्म दिले तथापि जननी कोणी करीना जसा
प्रेमाने प्रतिपाळ नित्य करुनी बत्तीस वर्षे तसा,
मायेचे न पडूं दिले स्मरणही ज्या मावशीने मला-
जाई सोडुनि ह्या जगास मजही ती जानकी प्रेमला; 
'नाहीं शोकरसी मजा, रस तरी कां आळवाना दुजा?'-
जीचे हे परिसोनि बोल दिधली म्यांही विलापा रजा,
अन्तर्बाह्य सुशीतला सुविमला भागीरथीसारखी,
गेली सोडुनि तीहि मूर्त कविता हा लोक माझा सखी;