पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फार तर लक्ष्मीमुक्तीची होतील. दिलेले वचन पुरे करायला फारसे सायास पडणार नाहीत.
 मोठमोठ्या विद्वानांनी, पुढाऱ्यांनी मला बजावले होते की, लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम अव्यावहारिक आहे. जमिनीच्या तुकड्याकरता शेतकरी भावाभावांत वैर माजते, डोकी फुटतात, मग स्वत:च्या बायकोच्या नावाने शेतकरी जमीन करून देतील हे निव्वळ अशक्य आहे असे अनेकांनी निक्षून सांगितले.
 पण शाब्बास मराठी शेतकऱ्यांची. त्यांनी या सगळ्या भल्या पंडितांना खोटे ठरवले. आजपर्यंत मी ४०० वर गावच्या लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमांना हजर राहिलो. पण गावांची यादी वाढतच आहे. आजमितीला दीड हजारावर गावांची लक्ष्मीमुक्तीची तयारी झाली आहे. आणि एवढ्या सगळ्या गावांना पोचायचे कधी आणि कसे या विचाराने मी चिंताक्रांत झालो आहे.
 इतक्या गावांत मी गेलो. स्त्रियांमध्ये अपार उत्साह, पुरुषांत नाराजीचा अंशही नाही. त्यांच्या चेहऱ्यावरून कृतार्थता ओसंडून चाललेली. गावांत साफसफाई करून, सडे घालून रांगोळ्या घालून पताका लावून रोषणाई करून स्त्री-पुरुष शेतकरी हा उत्सव साजरा करतात. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या गेल्या बारा वर्षात कितीक दुःखाचे प्रसंग कोसळले. घर उजाड झाले. कधी यश मिळाले कशी अपयशाचा सामना करावा लागला. आपण हाती घेतलेले हे सतीचे वाण कसे निभावते या चिंतेने कितीकदा व्याकूळ झालो. पण लक्ष्मीमुक्तीच्या या लोकविलक्षण यशाने सगळा शीण आणि सगळे दुःख दूर होऊन जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे.
 माझ्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांच्या मनांतसुद्धा लक्ष्मीमुक्तीच्या आंदोलनाविषयी खूप गोंधळ आहे. शेतीमालाला रास्त भाव हा एक कलमी कार्यक्रम सोडून संघटना कुठे वाट चुकून भरकटत तर चाललेली नाही ना अशीही शंका अनेकांच्या मनात आहे.
 काही कार्यकर्त्यांना वाटते, या लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमात काहीतरी खुबी, डावपेच आहे.
 कदाचित जमिनीची विभागणी घडवून आणून लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती सर्व शेतकऱ्यांना मिळाव्यात म्हणून साहेबांनी ही युक्ती काढली असावी असे काहींना वाटते.

 शेतकरी आंदोलनात स्त्रियांनाही भाग घेण्यास तयार करावे म्हणजे आंदोलने अधिक मोठी होतील, आंदोलकांत स्त्रिया असल्या म्हणजे लाठीमार होणार नाही गोळीबार होणार नाही. शेतकरी आंदोलनाची ताकद अश्या तऱ्हेने

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ९६