पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चार

लक्ष्मीमुक्ती : मंगल सावकाराचे देणे




 माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो,
 आपल्या गावातील शंभरावर शेतकऱ्यांनी आपल्या घरच्या लक्ष्मीच्या नावाने आपल्या जमिनीचा एक भाग करून दिला आणि लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम संपन्न केला याबद्दल आपला आणि गावाचा सन्मान करण्याकरिता मी येथे आलो आहे.
 पण आपला सन्मान मी करतो म्हणण्यापेक्षा, मला वाटते माझा स्वत:चा आपण सन्मान केला आहे. गावात एवढा अभूतपूर्व आनंदोत्सव साजरा होत आहे. गावात सगळी साफसफाई करून, अंगणात सडे घालून, रांगोळ्या घालून, पताका लावून, रोषणाई करून आपण हा उत्सव साजरा करत आहात. अगदी दिवाळी दसऱ्याला करणार नाही असा सण आपण केलात आणि एवढ्या मंगल महोत्सवाला मला निमंत्रण देऊन उपस्थित राहण्याचे सद्भाग्य दिलेत याबद्दल आपणा सर्व भावाबहिणींचे शतश: आभार.
 शेतकरी महिला आघाडीच्या लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमासंबंधी मी आज बोलू इच्छितोः
 लक्ष्मीमुक्ती हा काय कार्यक्रम आहे ? ज्या गावात शंभरावर शेतकरी आपल्या घरच्या लक्ष्मीच्या नावाने थोडीशी जमीन किंवा उत्पन्न करून देतील त्या गावाने 'लक्ष्मीमुक्ती' केली. एखाद्या गावात १०० खातेदारच नसले तर मग ८० टक्के शेतकऱ्यांनी असे केले आहे तर त्याही गावाला हा सन्मान मिळतो.

 सव्वा वर्षांपूर्वी म्हणजे २ ऑक्टोबरला १९९० रोजी मी जाहीर केले की ज्या ज्या गावात लक्ष्मीमुक्ती होईल त्या त्या गावात मी स्वतः जाऊन गावाच्या आनंदोत्सवांत सहभागी होईन; मग ते गाव भले आडवाटेला असो, दऱ्याखोऱ्यांत असो, डोंगराकपारीत असो, जंगलांत असो का वैराण माळमाथ्यावर असो. त्यावेळी माझी कल्पना अशी होती की उभ्या महाराष्ट्रात पाच-पंचवीस गावे

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ९५