पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुढील दिशा
 चांदवडच्या अधिवेशनाने शिक्षण, कायदा आणि व्यक्तिगत मदत या तीनही मार्गांनी झालेल्या प्रयत्नाचे ऐतिहासिक महत्त्व मानले. पण अशा प्रयत्नांच्या मर्यादाही दाखवून दिल्या व महिला आघाडीच्या काही कार्यक्रमाच्या दिशा स्पष्ट केल्या.
 १) महिला आघाडीचे आंदोलन पुरुषविरोधी नाही. महिला आंदोलनाला पुरुषविरोधी स्वरूप देणे आपण बसलेल्या फांदीवरच कुऱ्हाडीचा घाव घालण्यासारखे आहे. आंदोलनाचे स्वरूप लुटीची व्यवस्था विरुद्ध लूटविरोधी व्यवस्था असे आहे.
 २) महिला संघटनांनी पुरुषांनी चालवलेल्या संघटनांच्या विचारांचे कोणतेच ओझे बाळगू नये. ज्या महिला कार्यकर्त्या सार्वजनिक संस्थांत काम करतात त्यांनी अशा संस्थांसंबंधीची निष्ठा, महिला आघाडीच्या निष्ठेच्या तुलनेने नेहमीच दुय्यम समजावी.
 ३) शेतकरी संघटना "भारत" आणि "इंडिया" असा भेद मानत असली तरी महिला आघाडीला अशा प्रकारचे भेद मानण्याचे कारण नाही. स्त्रियांचा लढा हा सम्यक महिला आघाडीच्या रूपानेच परिणामकारक होऊ शकेल.
 ४) शेतकरी स्त्री शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यात शेतकरी म्हणून तिला पुरुषांपेक्षाही जास्त स्वारस्य आहे. शेतकरी आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. अशा सहभागामुळे त्यांचा आर्थिक फायदा तर हाईलच, पण त्यापलीकडे, महिला आंदोलनही सशक्त होईल. यासाठी शेतकरी आंदोलनात भाग घेतानाही स्त्रियांनी शक्यतो स्वायत्तपणे भाग घ्यावा.
 ५) स्त्रियांचे प्रश्न व्यक्तिगत नव्हे तर सम्यक पातळीवर हातात घेतले गेले पाहिजेत. पाचपंचवीस स्त्रियांनी एकत्र येऊन विद्वत्तापूर्ण चर्चा किंवा निवेदने करण्यापेक्षा एखादा छोटासा कार्यक्रम घेऊन लाखा-लाखाच्या संख्येने एकत्र येणे जास्त फलदायी आहे. कार्यक्रम दारूबंदीसारखा छोटा असो, किंवा सार्वजनिक बलात्काराच्या निषेधार्थ पंतप्रधानांच्या घराला वेढा घालण्याचा असो, निवडणुका लढवायच्या तर पंचायत राज्याच्या असो किंवा लोकसभेच्या असो, स्त्रियांची संघशक्ती उभी करणे ही स्त्रियांनी समाजात हजारो वर्षापासून गमावलेली प्रतिष्ठा, हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळविण्यासाठी बिनतोड साधन ठरणार आहे.

 चांदवड अधिवेशनानंतर शेतकरी महिला आघाडीस स्वतंत्रपणे एखादे आंदोलन करण्याची संधी मिळाली नव्हती. नांदेड अधिवेशनानंतर दारू दुकान

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८८