पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्याचा प्रयत्न केला आणि महत्त्वाचा दुवा सापडला तो म्हणजे आर्थिक प्रश्न म्हणजे स्त्री प्रश्न नव्हे. त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटल्याने स्त्रियांच्या समस्या मार्गी लागतीलच असे नाही. याकरिता तिच्याशी संवाद साधून तिच्याकडून या समस्या जाणून घेण्यात आल्या.
 त्यातून, स्त्रीचा आर्थिक दर्जा सुधारण्यासोबतच तिचा सामाजिक दर्जा सुधारणे अधिक महत्त्वाचे आहे हे स्पष्ट झाले. सामाजिक दर्जा सुधारण्यात सर्वप्रथम तिला कुटुंबात असणारे दुय्यम स्थान नष्ट करून बरोबरीचे स्थान मिळणे महत्त्वाचे होते. कारण नोकरदार व मजूर स्त्री जरी बरोबरीने अर्थार्जन करीत होती तरी तिला स्व इच्छेने स्वत:करितासुद्धा काहीही खर्च करण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे स्त्री ही घरात पैसा आणणारे यंत्रच ठरले होते. अशा स्थितीत शेतकरी महिला आघाडीने स्त्रियांच्या हक्काकरिता व समाजात तिचे स्थान तिला मिळवून देण्याकरिता "चांदवडची शिदोरी" च्या माध्यमातून एक नवीन दालन उघडण्याचे काम केले ; स्त्रीला समाजात बरोबरीचे स्थान मिळविण्याकरीता 'स्त्री विरुद्ध पुरुष' ही भूमिका योग्य नाही हे स्पष्ट केले. स्त्री आणि पुरुष हे परस्परविरोधी नव्हे तर परस्परपूरक घटक आहेत हे इतक्या वर्षाच्या समाजबांधणीतून स्पष्ट झाल्याचे दिसते. कारण पती-पत्नी, आई-मुलगा, वडील-मुलगी, भाऊ-बहीण ही प्राथमिक नाती प्रत्येक स्त्री-पुरुषाने मान्य करून एक सुंदर भावनिक गुंफण केल्याचे स्पष्ट होते. मात्र या सर्व नात्यांतील स्त्री पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे दुय्यमत्वाकडे गेल्याचेही आढळते. स्त्रीच्या या दुय्यमत्वाला केवळ पुरुष नव्हे तर स्त्रियाही जबाबदार आहेत हे इतिहासाने सिद्ध झाले. स्त्रीचे दुय्यमत्व संपवून तिला माणूस म्हणून जगण्याची संधी मिळविण्याची संकल्पना म्हणजे 'चांदवडची शिदोरी' होय.
 नोव्हेंबर १९८६ मध्ये लाखलाख स्त्री-पुरुषांनी संपूर्ण चांदवडची शिदोरी तीन दिवस डोळयात प्राण आणून समजून घेतली. स्त्री-पुरुष समानतेच्या समाज जीवनाची “गीता' म्हणून तिचा स्वीकार केला. पत्नीशी वागण्याच्या त्याच्या दृष्टिकोनात बदल झाला. सामाजिक परिवर्तनातून स्त्रीपुरुषमुक्तीची ही पहिली पायरी आम्हा सर्व स्त्रियांना सुखावून गेली, हे चांदवडचे वैशिष्ट्या आहे. चांदवड अधिवेशनाच्या ठरावांनी संपूर्ण स्त्रीचळवळीला नवीन दिशा दिली; स्त्रीला तिच्या प्रश्नाची जाणीव करून दिली. “आमच्या समस्या आम्हाला चांदवडच्या शिदोरीतून कळल्या” हे स्त्रियांचे मत म्हणजे स्त्रीप्रश्नाची खरीखुरी मांडणी झाल्याची पावतीच होय.

 १९८६ साली चांदवडच्या अधिवेशनातून परतलेली स्त्री आपल्या समस्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न /८