पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मार्क्सवाद्यांच्या बुडत्या गलबतात चढण्याची आवश्यकता नाही हे त्यानंतर रशियात घडलेल्या घटनांनी अधिकच स्पष्ट होते.
 काही किरकोळ वादांचे मुद्दे उपस्थित झाले. उदा. लुटालुटीची व्यवस्था, विशेषतः स्त्रियांचे अपहरण व पुरुषांची गुलामी यांची सुरुवात नेमकी कोणत्या पायरीला सुरू झाली? शेतीत बचत तयार झाल्यानंतर म्हणजे शेतीवर काम करणाऱ्या सर्वांना पुरून उरेल इतके धान्याचे उत्पादन होऊ लागल्यानंतर की त्या आधी?
 शेतीत बचत तयार होणे याचा अर्थ शेतीवर जगणाऱ्या सर्वांना खाऊन- पिऊन उरेल इतके उत्पादन होणे ही व्याख्या शांततेने आणि गुण्यागोविंदाने भांडवल निर्मिती करणाऱ्या समाजात योग्य आहे. लुटालुटीच्या व्यवस्थेत मात्र शेतीतील बचत याचा अर्थ लुटारूंच्या दृष्टिकोनातून वेगळा होतो. शेती पिकते ती वर्षातून ठरावीक दिवसात. खळ्यात धान्याची रास असायचीच, लुटारूंच्या दृष्टीने त्या वेळी लूटमारीची शक्यता तयार होतेच. लुटीनंतर शेतकरी स्वत:चे पोट कसे काय भरेल याची चिंता लुटारूंना पडण्याचे काहीच कारण नाही. म्हणजे लुटालुटीचे राज्य शेतीवर आर्थिक बचत तयार होण्याच्या आधीच सुरू झाले असावे हे तर्काला पटण्यासारखे आहे.
 पण अशी लूटयोग्य बचत तयार होण्याच्या आधीच स्त्रियांना पळवणे व पुरुषांना गुलाम करणे या कार्यक्रमास सुरुवात झाली असेल हे मोठ्या प्रमाणावर तरी शक्य नाही. स्त्रियांना काय किंवा गुलामांना काय, पळवून आणायचे ते काही हेतूने, उपाशी ठेवून मारण्यासाठी नाही त्यांना खायला घालण्याकरिता तरी पळवणाऱ्याकडे धान्याचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे. लुटारूंच्या स्वतःच्या आवश्यकतेपेक्षा जास्त धान्य त्यांच्याकडे साठा म्हणून असले पाहिजे किंवा असे धान्य मिळत राहण्याची काही किमान शक्यता असली पाहिजे. थोडक्यात, कुठेतरी नेहमीच्या आवश्यकतेपेक्षा जास्त धान्य साठ्यात असल्याखेरीज स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या पळवापळवीला काही अर्थ राहणार नाही.

 शेतीतील पहिली बचत धान्याच्या रूपात झाली का पशुपालनात झाली याही वादाला तसे फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. शेती आणि पशुपालन हे थोड्याफार अंतराने जवळजवळ एकाच काळात सुरू झालेले व्यवसाय आहेत. जनावरे पाळली जातात तेव्हा सगळ्याच वेळी त्यांना चरायला कुरणात सोडता येते असे नाही. काही काळापुरती त्यांचीसुद्धा बांधल्या जागी खाण्याची सोय करावी लागते. जनावरे पाळण्याची कला आणि व्यवसाय शेतीमध्ये वरकड

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८४