पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लढाई करू शकणाऱ्या पुरुषांची उत्पत्ती जास्तीत जास्त व्हावी हे प्रमुख उद्दिष्ट बनले. पुरुषांची संख्या वाढावी, त्यांच्यातील लढाऊ गुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच स्त्रियांनीही युद्धकाळात तटस्थ राहू नये, पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या संरक्षणासाठी निष्ठा ठेवावी अशी रचना तयार झाली. स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे आणि गुलामगिरीचे हे उगमस्थान आहे.
 लुटारूदरोडेखोरांची जागा राजामहाराजांनी घेतली. त्यांच्या जागी जमीनदार, सावकार आले. त्यांचीही जागा काही काळाने व्यापारीकारखानदारांनी घेतली. लुटीच्या पद्धती बदलत गेल्या. लुटीची व्यवस्था कायमच राहिली. आज लूट होते ती हत्यारांचा किमान वापर करत, पण गावांत गुंडांचे आणि शहरांत दादांचे राज्य चालूच आहे. घराबाहेरची असुरक्षितता ही आजही स्त्रीच्या मार्गातील सगळ्यात मोठी अडचण आहे. बाहेरच्या अत्याचारापेक्षा घरचा अत्याचार परवडला या जाणिवेने स्त्री घरातले आणि समाजातले दुय्यमत्व चालवून घेते एवढेच नाही, गोडही मानून घेते.
 लुटालुटीच्या व्यवस्थेने समाज व कुटुंबजीवन दूध फाटल्यासारखे झाले आहे. स्त्री आणि पुरुष यांना दोघांनाही ममता, प्रेम, ऋजुता, सौंदर्य, बुद्धी, कर्तबगारी, धाडस, शौर्य या सर्व गुणांचा समुच्चय कमीअधिक प्रमाणात मिळाला आहे. लुटीच्या व्यवस्थेत या गुणांची विभागणी झाली आणि ममता, प्रेम, ऋजुता, सौंदर्य इत्यादि गुणांचे अतिशयोक्त रूप स्त्रीवर लादण्यात आले; तर कर्तबगारी, शौर्य, क्रौर्य इत्यादि गुणांचे राक्षसी विडंबन पुरुषांवर लादण्यात आले. स्त्रीची गुलामगिरी ही पुरुषांनाही बाधक आहे.

 स्त्रियांवर दुर्दैव कोसळले ते केवळ जित आणि पराभूत समाजातच नव्हे, जेत्यांच्या टोळ्यांतल्या स्त्रियांचीही गत यापेक्षा काही वेगळी झाली नाही. हल्लाखोर जेत्यांनाही त्यांच्या समाजाची रचना युद्धपातळीवरच करावी लागली म्हणजे पर्यायाने स्त्रीवर दुय्यमत्व आलेच. स्त्रियांची परिस्थिती जेत्या समाजात वाईट असायचे आणखी एक कारण होते. लुटून आणलेल्या मालमत्तेची मालकी वारसाहक्काने कोणाकडे जायची या चिंतेतून जेत्या समाजात स्त्रियांवर विशेष कडक बंधने लादली गेली. स्त्रियांच्या जागतिक ऐतिहासिक पराभवाच्या एंगल्सच्या मीमांसेला जेत्या समाजात काहीसे स्थान आहे. लुटीच्या व्यवस्थेने समाज नासला. त्या वेळी तयार झालेली आपत्कालीन समाजव्यवस्था चिरस्थायी झाली. त्यातून स्त्रीकडे विकृत मृदुतेची भूमिका आली तर पुरुषांकडे विपरीत विक्राळ क्रौर्याची. लुटीत कोणी जिंकले, कोणी हरले, प्रत्येक लढाईत पराभव झाला तो दोन्हीकडच्या स्त्रियांचा.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८१