पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वच्छ मांडणी त्यांनी केली. स्त्रियांच्या प्रश्नाचा उगम काय याबद्दलच त्यांनी वेगळे मत मांडले असे नाही तर स्त्री काय शोधते आहे याबद्दलच्याही आजपर्यंतच्या मांडलेल्या सर्व कल्पना त्यांनी रद्द ठरवल्या.
 स्त्रीप्रश्नाची उकल
 स्त्रीप्रश्नाचा उगम काय याबद्दलच्या आजपर्यंतच्या मूलभूत कल्पनांनाच त्यांनी धक्का दिला.
 स्त्रीपुरुषात जीवशास्त्रीय श्रेष्ठ-कनिष्ठता नाही, त्यांच्यात श्रमविभागणी विविध प्रकारांनी होऊ शकते, स्त्री विरुद्ध पुरुष असा काही वर्गसंघर्ष नाही व मालमत्तेच्या मालकीसाठी झालेले हे भांडण नाही आणि केवळ जुलूम जबरदस्तीने व्यवस्था टिकून राहत नाही, टिकून राहण्यासाठी सर्व संबंधितांची काही परस्पर सोय असते हे मानले म्हणजे स्त्रियांच्या प्रश्नाची एक अगदी नवी उकल करणे जरुरीचे होते.
 'चांदवडच्या शिदोरी'त स्त्रीप्रश्नाच्या आदिकारणाविषयी मांडलेला तर्क थोडक्यात असा आहे-
 शेतीमध्ये पहिली बचत झाली तेव्हापासून लुटालुटीच्या एका कालखंडाला सुरुवात झाली. उत्पादकांपेक्षा लुटारूंचाच धंदा किफायतशीर ठरला. तेव्हापासून लुटारूंच्या व्यवसायात मोठी उत्क्रांती होत गेली. एका काळचे चोरलुटारू हळूहळू सरदारसुभेदार बनले; कधी दूरवरच्या प्रांतातून, देशांतून सुलतान आले. शेतीत होणाऱ्या गुणाकारावर ताबा मिळविण्याकरिता लढायांचे एक पर्व सुरू झाले. उत्पादकांच्या श्रमावर लुटारूंनी जगण्याचे हे पर्व.

 पहिली बचत तयार झाल्यानंतर जो समाज तयार झाला तो या बचतीतून तयार झालेल्या मालमत्तेचा वारसा कोणाकडे जाईल याची चिंता करणारा नव्हता, तर प्रामुख्याने या नव्या भयाण कालखंडात जगून वाचून कसे राहायचे याची चिंता करणारा होता. मनुष्य ज्याप्रमाणे गाईम्हशींच्या गोठ्यावर जगतो त्याप्रमाणे लुटारू शेतकरी समाजाच्या जीवावर जगू लागले. शेतीतील धनधान्य काढून न्यावे, गुरेढोरे, घोडे ताब्यात घ्यावेत; श्रमशक्ती वाढविण्याकरिता स्त्रियांनाही उचलून न्यावे असा एकच हैदोस सुरू झाला. शेतकरी समाजात तशी निरुपयोगी गोष्ट एकच आणि ती म्हणजे पुरुष. गाई-म्हशींच्या गोठ्यात जश्या कालवडी राखल्या जातात, गोऱ्हे-रेडे निरुपयोगी म्हणून काढून टाकले जातात त्याप्रमाणे गावावर धाड पडली की पुरुषांची सरसहा कत्तल होत असे. स्वसंरक्षणासाठी हाती हत्यार घेऊन लढाई करण्याचे काम पुरुषांकडे या कारणाने आले. अश्या परिस्थितीमध्ये एक नवीन समाजव्यवस्था तयार झाली. या व्यवस्थेत

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ८०