पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोचला तर घराच्या आततरी बाईला माणूस म्हणून वागवले जाईल काय?
 ३) बाई कष्टाला कुठेच कमी पडत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत राबते, घरकाम बघते, पोरांचे बघते, शेतातले बघते, पाणी वाहून आणते, सरपण गोळा करून आणते. पुरुष घडीघडीला तंबाखूसाठी तरी सावलीला बसतात. बाईचा कामाचा झपाटा चालूच असतो. पुरुषांना न जमणारी किती तरी कामे बायाच करतात. खास पुरुषांची मानली जाणारी कामेही वेळ पडली तर बाया करू शकतात आणि करतात. जोतिबा फुल्यांनी म्हटल्याप्रमाणे श्रेष्ठकनिष्ठ विचार करायचाच झाला तर स्त्री आणि पुरुष या उभयतांमध्ये जास्ती श्रेष्ठ स्त्रीच आहे. तरीही मग तिची अशी दैन्यावस्था का?
 ४) इंडिया भारताचे शोषण करतो असे शेतकरी संघटनेच्या विचारात मांडले; पण इंडियातल्या बायापण काही सुखी दिसत नाहीत. तेथील पुरुषांनी लुटून जमा केलेल्या ऐश्वर्याचा काहीसा झगमगाट त्यांच्याही अंगावर दिसत असेल. पण दरवेशाने आपल्या माकडाच्या अंगावर घातलेले मखमलीचे जाकीट दरवेशाचे वैभव दाखवते, माकडाचे नाही. इंडियातील स्त्रीही दुःखी, भारतातील बाईही दुःखी. मग या दोघींतील नाते दोस्तीचे की दुश्मनीचे ?
 'चांदवडच्या शिदोरी'त या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला. देवाने स्त्रीपुरुष वेगळे निर्माण केले, पण त्या वेगळेपणात श्रेष्ठ- कनिष्ठता नाही. बायकांनी चूलमूल सांभाळावी व पुरुषांनी घराबाहेरील कामे करावीत ही आज सर्वत्र दिसणारी पद्धत काही कोण्या परमेश्वराने घालून दिलेली नाही. अगदी स्त्रियांनी शिकारीचे, लढाईचे काम करावे आणि पुरुषांनी घरकाम सांभाळावे असेही समाज असू शकतात; एवढेच नव्हे तर इतिहासात प्रत्यक्ष होतेही. स्त्रीचे आजचे दुय्यम स्थान तिच्यावर लादलेले नाही, इतिहासाच्या एका विशिष्ट परिस्थितीत आपापले संसार टिकवण्याकरिता स्त्री-पुरुषांनी सोयीसोयीने तयार केलेली ही एक तात्पुरती व्यवस्था होती. ज्या परिस्थितीमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान स्वीकारावे लागले ती परिस्थिती झपाट्याने नाहीशी होते आहे. आता दुय्यम स्थान मान्य करण्यात स्त्रीला काहीही स्वारस्य राहिले नाही. पुरुषप्रधान व्यवस्था चालत राहिली आहे ती परंपरेच्या ओघाने आणि पुष्कळशी बळजबरीने. स्त्रियांना आता माणूस म्हणून जगायचे आहे.

 स्त्रीप्रश्नावरची आजवर मांडलेली सर्व मते आणि मांडण्या चांदवडला जमलेल्या बायांनी खोडून टाकल्या. मार्क्सवादी आणि स्त्रीमुक्तिवादी या दोघांचेही विचार बाजूस ठेवून साधी सोपी आणि सरळ, पण मनाला पटणारी अशी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७९