पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन

अमरावतीची आयुधे




 शेतकरी महिला आघाडी : विचार आणि दिशा
 चांदवड येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये शेतकरी संघटनेने पहिले महिला अधिवेशन भरवले. शेतकरी महिला आघाडीची स्थापना चांदवड येथील अधिवेशनातच झाली. अमरावती येथील हे अधिवेशन शेतकरी महिला आघाडीने भरवलेले आहे. चांदवडच्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र बापू पाटील होते. अमरावतीच्या स्वागताध्यक्षा सौ. विमलकाकू पाटील आहेत.
 चांदवड ते अमरावती हा प्रवास काही लहानगा नाही.
 शेतीमालाला भाव मिळाल्यावर शेतकरी बाईचीही दुःखं संपतील काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्याकरिता चांदवडला शेतकरी महिला जमल्या. गावातल्या पाणवठ्यावर जमून बायांनी एकमेकींना सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्या त्याप्रमाणे चांदवडच्या अधिवेशनात साऱ्या महाराष्ट्रातून बाया जमल्या. त्यांनी पुढे टाकलेला प्रश्न होता, "आम्ही मरावं किती?" चांदवडच्या अधिवेशनाचे प्रतीक होते शेतात राबणारी, पाठीला पोर बांधलेली, डोक्यावर पाटीचे ओझे वाहणारी, शेतात कष्टणारी स्त्री.
 अमरावतीच्या अधिवेशनाचे प्रतीक आहे स्त्री-शक्तीचे प्रतीक दुर्गा. अमरावतीला ग्रामीण विभागातील स्त्रिया जमणार आहेत त्या केवळ दुःख मांडायला नाही, त्यावर तोडगा काढायला. शेतकऱ्यांच्या या स्वातंत्र्यवर्षात ग्रामीण स्त्री शेतकरी भावांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात भाग घेत आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांच्या वेगळ्या अशा प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिताही ती सज्ज आहे.

 चांदवडच्या अधिवेशनात बाया "चांदवडची शिदोरी" घेऊन आल्या होत्या. त्यांच्यातल्या थोड्या शिकल्यासावरल्या बायांनी काही ठराव तयार केले. एक जाहीरनामासुद्धा तयार केला. तेथे जमलेल्या, संख्येने दोन लाखांपेक्षा जास्त,

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७७