पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

छातीसुद्धा होत नाही. घराच्या दरवाजाला आतून चार चार कड्या लावून माणसं स्वत:ला बंद करून घेतात. इथल्या शहरांत ही अवस्था फारशी दूर नाही. मध्ययुगीन असुरक्षिततेचे वातावरण कायम राहिले, फक्त असुरक्षितेचे जनक बदलले.
 १९७५ सालानंतर या देशातील स्त्री-मुक्तीच्या प्रामुख्याने शहरी उद्गात्यांच्या दुःखाचे मूळ कारण हे आहे. सुसान ब्राऊन मिलरने मांडलेली कल्पना "चार भिंतीच्या बाहेरच्या अत्याचारापेक्षा आतले अत्याचार स्त्री पत्करते", इथे साकार झालेली दिसते. आर्थिक शोषणाच्या लढाईतील जेत्यांच्या घरच्या गुलामांचे हे दुःख आहे. कागदोपत्री आणि कायद्यांच्या पुस्तकात काहीही तरतुदी मिळवल्या तरी असुरक्षिततेच्या वातावरणात स्त्री-मुक्ती हे मृगजवळच राहणार.
 जेत्या इंडियातील स्त्रियांनी जसे आपल्या प्रश्नाकडे व्यापक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे तसेच जित भारतातील स्त्रियांनाही या प्रश्नाकडे केवळ आर्थिक शोषणाच्या दृष्टीतून पाहून चालणार नाही. वरकड उत्पादनाच्या निर्मितीपासून तयार झालेला हा जुना रोग आहे. त्याच्या आर्थिक आघाडीवर पुरुष मंडळी लढाईची जमवाजमव करत आहेत. त्याच वेळी भारतातील स्त्रियांना तिहेरी लढाई द्यावी लागणार आहे.
 (१) शेतीत राबणाऱ्या कामकरी, कष्टकरी म्हणून त्या कष्टाचा मोबदला मिळविण्याचा लढा.
 (२) स्त्री म्हणून सहन कराव्या लागणाऱ्या अनेक अन्यायांविरुद्धचा लढा.
 (३) समाजातील असुरक्षितता दूर करून तंत्रज्ञान उघडून देत असलेल्या नवीन दालनात शांततेच्या काळातील स्त्रीच्या सर्वश्रेष्ठ अशा देणग्यांचा उपयोग करणे.
 या तीनही आघाड्यांवर सर्व स्त्रियांची एकजूट होऊ शकते. शेतीचे शोषण कायमचे बंद करण्यात प्रत्येक स्त्रीला स्वारस्य आहे, अगदी त्या शोषणातून आर्थिक लाभ मिळणाऱ्या स्त्रियांनासुद्धा.
 "कामकरी स्त्रियांची आघाडी"

 उत्पादक श्रमात पूर्णपणे भाग घेत असताना त्याबरोबरच सगळ्या घरकामाचाही गाडा वाहायचा हे सुशिक्षित स्त्रियांचे आजकालचे दुःख शेतकरी स्त्री पिढ्यान्पिढ्या वाहत असते. पंधरा, सोळा तास रोज काम. त्यात सुटी नाही, अगदी आजारपणातसुद्धा नाही. बाळंतपणाची सुटी नाही. लहान पोरसुद्धा पाठुंगळी बांधून नाहीतर झुडुपाच्या सावलीला झोपवून काम ओढलंच पाहिजे.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७३