पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 इंग्रजांच्या आमदानीपासूनच व्यावसायिक ठग, दरोडेखोर आणि लुटारू यांचा मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त झाला होता. त्याआधी राजकीय वर्चस्व गाजविलेले मुसलमान गावात काय आणि शहरात काय, वस्तीमोहल्ल्यात कसाबसा जीव तगवून राहत होते. तेराव्या शतकापासूनच हिंसाचाराचे थैमान घालणारे दोन्ही घटक आता थंड झाले आणि त्याबरोबर १३व्या शतकापर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचा व्यवसाय केला होता त्यांच्या हातीच पुन्हा एकदा आर्थिकच नव्हे तर राजकीय सत्ताही आली. शासकीय प्रकल्पांच्या व सहकाराच्या साम्राज्यातून गावोगाव गुंडगिरीच तयार झाली. आर्थिक प्रगती आणि स्त्रियांची मुक्ती यांचा संबंध किती किरकोळ आहे हे कोणत्याही साखर कारखान्याच्या परिसरात पाहायला मिळेल. कारखाना झाला, नव्या डांबरी सडका आल्या, ट्रॅक्टर दिसू लागले, मळे हिरवेगार दिसू लागले, कर्जबाजारीपणा वाढला तरी, उचलीचे का होई ना, चार पैसे हातात खेळू लागले, तरीही या भागात स्त्रियांच्या परिस्थितीत पडलेला फरक अगदी अत्यल्प. कारण वातावरणातील असुरक्षितता कायम राहिली, तिचे जनक फक्त बदलले !
 शेतीच्या जीवावर पोसलेल्या इंडिया समाजातसुद्धा हीच परिस्थिती. उंच उंच मजल्यांच्या इमारती चढल्या. काही निवडक लोकांच्या हाती अगदी पाश्चिमात्य देशांतील अद्ययावत उपभोगाची साधने खेळू लागली. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर घराबाहेरील कामही करू लागल्या आणि तरीही स्त्रीच्या दर्जामध्ये कोठे फरक पडतो आहे असे दिसले नाही.

 शहरांच्या वाढीबरोबरच उद्ध्वस्त झालेल्या खेड्यांतून लक्षावधी निर्वासितांचे लोंढे शहरांकडे जात आहेत. मोठ्या शहरांत झोपडपट्ट्यांत व फूटपाथवर राहणाऱ्यांची संख्या निम्म्याहून अधिक झाली. शेतीच्या भोवऱ्यात सापडलेली ही मंडळी खाली खेचली जात असताना इतक्या कठीण अनुभवातून जाऊन एक दिवस गावातील घरदार, चीजवस्तू फुकून शहरात दाखल झाली. त्यातील बहुसंख्यांचा आता कोणत्याही संस्कृतीशी संबंध राहिलेला नाही. शहरातील अठरापगड जमातींच्या गलिच्छ वस्त्यांमध्ये काही काळ जीव घुसमटला तरी दिवसातून निदान एकदा पोट भरण्याची शाश्वती असण्याचे समाधान काही थोडे नसते. आपण कोठे होतो, कोण होतो, कोठे आलो, काय करतो आहोत हा विचार अशक्य झाला आहे. हातभट्टी, मटका, गुंडगिरी, गुन्हेगारी, तस्करी येथून ते इमारत बांधणी आणि आयातनिर्यातीचा व्यवसाय इथपर्यंत काळ्या व्यवसायांची साम्राज्ये चालविणाऱ्यांची दादागिरी शहरांत प्रस्थापित झाली. अमेरिकेतल्या अनेक शहरांत अंधार झाला म्हणजे बाहेर पडण्याची कोणाची

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७२