पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मार्गांनी वरकड उत्पादनाचे शोषण होतच राहिले. व्यापारी आणि औद्योगिक क्रांतीनंतर सावकारी, जमीनदारी आणि अपुरे भाव ही शोषणाची नवीन हत्यारे तयार झाली.
 वरकड उत्पादनाच्या पहिल्या कालखंडात सगळीकडे एकच धुमाकूळ सुरू झाला. पावसाळा संपला की लुटारू बाहेर पडायचे. ते पुन्हा शेतीचा हंगाम चालू होईपर्यंत कार्यक्रम लढायांचा आणि लूटमारीचा. हिंदुस्थानसारख्या देशात तर बाहेरून येणाऱ्या आक्रमकांची त्यात भर. या लढायांमध्ये पुरुष माणसे अतोनात मारली जायची. त्यामुळे स्वाऱ्यांचा हेतू वरकड उत्पादन लुटण्यापुरताच मर्यादित न राहता लोकसंख्यावाढीच्या दृष्टीने स्त्रियांचे अपहरण हाही झाला. असुरक्षिततेचे आणि हिंसाचाराचे वातावरण आणि स्त्रियांची अशा परिस्थितीत निवाऱ्याची आणि संरक्षणाची गरज ही एकच गोष्ट कुटुंब आणि समाजव्यवस्थेत बदल घडवून आणायला पुरेशी होती. नटेश्वर प्रकृतीचे विभाजन आणि ध्रुवीकरण मध्ययुगातील गदारोळात अपरिहार्य होते.
 पुरुषांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असल्याने समाजातील पुरुषांचे प्रमाण सांभाळणे हा सुसंस्कृत समाजाच्या चिंतेचा विषय झाला. प्रत्येक घर हल्ल्याच्या प्रतिकारासाठी सज्ज तटबंदीसारखे दिसू लागले. स्त्रियांना अधिकाधिक सुरक्षित जागी दडवण्याचे प्रयत्न झाले असले पाहिजेत. परिणामतः, जितकी संपन्नता अधिक तितकी त्या कुटुंबातील स्त्रियांची गुलामगिरी अधिक. ज्यांच्याकडे लुटण्यासारखे काही नव्हते आणि ज्यांच्या स्त्रिया काबाडकष्टात रुतलेल्या होत्या त्यांना या संरक्षणाची गरजही कमी आणि शक्यताही कमी. जास्तीत जास्त मुलगे जन्मावेत, त्यांना बालपणापासून संरक्षणाच्या आणि आक्रमणाच्या कामासाठी मनाने व शरीराने तयार करावे ही समाजाची प्राथमिक गरज बनली. त्यासाठी जी काही झीज सोसायची ती साहजिकच स्त्रियांच्या माथी आली. जगून, वाचून राहणे हेच उद्दिष्ट झालेल्या समाजात स्त्रियांची हालचाल, शिक्षण, स्वातंत्र्य व सुख यांची चिंता पुरुषांनी केली नाही आणि भीतीने भारलेल्या त्या काळात स्त्रियाही सर्व काही सोसून या संरक्षणप्रयत्नांच्या मागे उभ्या राहिल्या.
 ज्या समाजांचा एकामागोमाग एक सतत पराभवच होत गेला त्यातील स्त्रियांची त्या प्रमाणात पीछेहाट झाली. पुरुष गेल्यावर संरक्षक नावालाही नाही अश्या परिस्थितीत सतीसारख्या अमानुष प्रथेलाही समर्थन आणि प्रतिष्ठा मिळू शकली.

 मध्ययुगातील लढायांत हरो, जिंको कोणीही, शेतकरी लुटलाच गेला.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ७०