पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि परिणामतः स्त्रियांवरील या अन्यायाच्या अंधाराचा शेवट अपरिहार्यपणे झालाच पाहिजे.
 ही संघटनेच्या विचाराची शास्त्रशुद्ध मांडणी आहे.
 प्राग्मानवसमाजशास्त्राने सांगितलेल्या पहिल्या कालखंडात मानवसमाजांची अर्थ आणि कामव्यवस्था नेमकी कशी राहिली असेल याबद्दलचे पांडित्यपूर्ण वादविवाद स्त्री-प्रश्नाच्या चर्चेसाठी अनावश्यक आहेत. शास्त्राच्या आजच्या अवस्थेत असे वादविवाद निर्णायक ठरण्याची काहीही शक्यता नाही.
 वरकड उत्पादन ही प्रचंड क्रांतिकारी घटना होती. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांत गरजेपलीकडचे उत्पादन करणारा मनुष्य हा पहिला प्राणी झाला. या उत्पादनामुळेच त्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावू लागल्या आणि निसर्गाच्या दास्यातून मनुष्यप्राणी पहिल्यांदा सुटका करून घेऊ लागला. पशुपालन आणि शेती यातून तयार झालेले पहिले वरकड उत्पादन आपल्या पश्चात कोणाकडे जाईल याची चिंता करायला त्या काळच्या समाजाला फारसा वेळ मिळाला असण्याची शक्यता नाही. वरकड उत्पादनाच्या आधाराने काहींनी नांगर, औते, औजारे बनवली आणि उत्पादन आणखी वाढविण्याची कास धरली.
 लुटीच्या अनेक तऱ्हा
 शिकारीसाठी आणि पशुपालनासाठी तयार केलेली आणि परजलेली हत्यारे माणसांविरुद्धही वापरता येतात हे काही त्याला माहीत नव्हते असे नाही. त्या वेळेपर्यंत मनाला आवडलेली एखादी स्त्री मिळवण्याकरिता शस्त्रांचा त्याने तसा वापरही केला होता. पण त्या शस्त्रांच्या साहाय्याने आता साधनसंपत्ती हस्तगत करण्याची नवीनच शक्यता तयार झाली. नांगर, बैल लावून शेतीतून जास्त उत्पादन काढण्यापेक्षा हा मार्ग अधिक सोपा आणि किफायतीशीर. लुटालूट ही वरकड उत्पादनाची जवळजवळ जुळी बहीणच. शेतीत पिकलेल्या अन्नधान्याची लूट सुरुवातीस काही भुरट्या चोरलुटारूंनी केली असेल. नंतर हे काम दरोडेखोरांच्या टोळ्यांनी केले. काही काळानंतर या टोळ्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि राजकीय सत्तेची स्थापना झाली. राजकीय व्यवस्थेची सुरुवात सज्जनपणे पशुपालनाने व शेती करणाऱ्या मानवांनी केली नाही. राजकारण हे पहिल्यापासूनच दुसऱ्यांच्या श्रमावर मौज मारू इच्छिणाऱ्या ऐतखाऊंचे कुरण होते.

 लहान लहान टोळ्यांत प्रदेशाच्या विभागणीसाठी लढाया होत. त्यात कोणीही जिंको कोणीही हरो, शेतकऱ्यांची लुटालूट होतच असे. यातूनच राज्ये, साम्राज्ये उभी राहिली. युद्धकैद्यांची गुलामगिरी, वेठबिगारी, जातिव्यवस्था, महसूल या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६९