पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 खासगी मालमत्तेच्या वारसाबद्दलच्या पुरुषी चिंतेने गुलामगिरी निर्माण झाली ही मार्क्सवादी कल्पना अगदी बाळबोध तर्कालाही न पटणारी आहे. अतिरिक्त निर्मितीचे शोषण हे जवळपास शिस्तशीरपणे, शांततेने झाले; या शोषणाचे स्वरूप औद्योगिक क्रांतीनंतर बदलून त्याला श्रमशक्तीच्या शोषणाचे रूप आले आहे या मार्क्सवादी कल्पनेला इतिहासात आधार नाही. श्रमशक्तीची उत्पादकता, श्रमशक्तीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या क्रयवस्तूंचे मूल्य असल्या कीर्दखतावणींच्या खेळींनी भांडवलनिर्मिती इतिहासात घडलीच नाही. वरकड उत्पादन जन्माला आले ते शस्त्रास्त्रांना बरोबर घेऊनच. औद्योगिक क्रांतीच्या व्यवस्थांमुळे काहीसा बदल येईपर्यंत या वरकड उत्पादनांच्या नियंत्रणासाठी जगभर नासधूस, बलात्कार, जाळपोळ, रक्तपात यांचा एकच हलकल्लोळ उडून गेला. मध्ययुगातील सर्व राष्ट्रांचे इतिहास या हलकल्लोळीने भरले. या हलकल्लोळीत जगूनवाचून टिकण्याकरिता सर्व स्थिर समाजांना आपापल्या व्यवस्था बदलून टाकाव्या लागल्या. या उत्पातांचा अर्थ समजल्याखेरीज स्त्रियांच्या प्रश्नाचे मूळ समजणे शक्य नाही.
 स्त्रीवाद्यातील जहालांचा जीवशास्त्रीय वस्तुवाद निर्णायक ठरला असेल हे तर्कसुसंगत नाही. उत्क्रांत मनुष्यप्राण्यात जन्मजात शारीरिकतेपेक्षा जन्मानंतर कमावलेल्या गुणांचेच प्राबल्य असते. जन्मतः स्त्री दुर्बल नाही हे आता जीवशास्त्राने स्पष्ट केले आहे. पण ती तशी असती तरीसुद्धा तेवढ्याच कारणाने ती अनंतकालपर्यंत दुय्यम दर्जाची राहिली नसती. मार्क्सवादी वस्तुवाद इतिहासाचा अर्थ समजण्यासाठी आजही अधिक उपयुक्त आहे. पण मार्क्सवादी तत्त्वज्ञान रास्त असले तरी मार्क्सवादी जीवशास्त्र चुकीचे सिद्ध झाले आहे आणि अर्थशास्त्र इतिहासाच्या कसोटीला उतरलेले नाही.
 शेतकरी संघटनेच्या विचारपद्धतीची विशेषता ही की मार्क्सवादाचे निष्कर्ष चुकीचे आहेत असे दिसून आल्यानंतर स्त्रीवाद्यांतील जहालांप्रमाणे गडबडून जाऊन संघटनेने मार्क्सवादातील ग्राह्य भागाचाही त्याग केला नाही. वस्तुवाद मान्य करून संसिद्ध जीवशास्त्र आणि इतिहासात दिसून आलेल्या अतिरिक्त उत्पादनाच्या शोषणाच्या पद्धती यांच्या आधारे एक व्यापक आणि सुसंगत स्पष्टीकरण पुढे ठेवले.

 स्त्री जन्मतः श्रेष्ठ, कनिष्ठ नाही. काही प्रमाणात मितिज्ञान, प्रतिभा आणि हिंसकता यात काय फरक असेल तेवढाच. इतिहासात वेगवेगळ्या समाजांत स्त्री-पुरुषांची श्रमविभागणी वेगवेगळ्या प्रकारे झालेली आढळते. मानव-समाजातील स्त्रियांच्या प्रश्नाचे मूळ आर्थिक घडामोडीतच असले पाहिजे

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न /६८