पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहेत. स्त्रीवाद्यांतील एक गट याही काळात स्त्रीची पराधीनता अपरिहार्य होती असे मानतो. मार्क्सवाद्यांतील एक गट या काळात स्त्रियांचे प्राधान्य असलेली कुटुंबपद्धती किंवा मातृअधिकार अस्तित्वात होता असे मानतात तर काही जण त्यापलीकडे जाऊन त्या काळात स्त्री-सत्ताक समाज होते आणि पुरुषांची अवस्था दुय्यम दर्जाची होती असे मानतात. मार्क्सवाद्यांतील दोन्ही गटांच्या मताप्रमाणे मिथुनकुटुंबात स्त्रीचे वर्चस्व चालू राहिले. पुरुषांचे काम - शिकार करणे, जनावरे पाळणे आणि शेती पिकवणे हे - दुय्यम समजले जाई. मुलांना जन्म देणे, जोपासना करणे आणि आणलेल्या अन्नाची वाटणी व वासलात लावणे ही स्त्रियांची कामे जास्त महत्त्वाची समजली जात. पण हळूहळू मांस, दूध-दुभते आणि अन्नधान्ये यांची मुबलकता तयार होऊ लागली, आवश्यकतेपेक्षा अधिक होऊ लागली तसतसे निर्वाहसाधनांची वरकड हाती आल्यामुळे वस्त्रे, निवारा, अवजारे आणि त्याहूनही महत्त्वाचे, हत्यारे यांचे उत्पादन करण्यास आवश्यक ती सवड आणि श्रमशक्ती मिळू लागली. या भांडवली वस्तू खाऊन, वापरून संपत नाहीत; दीर्घकाळ चालतात. त्या निर्माण करणारा मरून गेला तरी मागे उरतात. साहजिकच, त्यांची मालकी हा एक महत्त्वाचा प्रश्न बनतो. आपण तयार केलेली साधने आपल्या हाती राहावीत, एवढेच नव्हे तर आपल्यानंतर ती आपल्या खऱ्याखुऱ्या, रक्ताच्या वारसाकडे जावीत, भलत्यासलत्या लुंग्या-सुंग्याच्या हाती ती लागू नयेत अशा प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू झाली आणि वारस मुलाच्या पितृत्वाची बिनधास्त खात्री ठेवता यावी यासाठी पुरुषांनी स्त्रियांवर बंधने लादायला सुरुवात केली. हळूहळू मातृसत्ता, मातृअधिकार, मातृप्राधान्य आणि मातृवंशकता संपुष्टात येत पितृवंशकता, पितृप्राधान्य, पितृअधिकार आणि पितृसत्ता अशी व्यवस्था टप्प्याटप्प्यांनी प्रस्थापित झाली.
 स्त्रीवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीपासून जीवशास्त्रीय कारणांमुळेच पुरुषसत्ता प्रस्थापित झाली. बळजोरीने, घरगुती व शैक्षणिक संस्काराने आणि "फितुर" वयस्कर स्त्रियांच्या मदतीने पुरुषांनी सत्ता टिकवून धरली हे किमानपक्षी संभाव्य तरी वाटते ; स्त्री-पुरुषांत अशा तऱ्हेची विद्वेषभावना असावी हे गृहीततत्त्व मुळातच विकृत आहे ही गोष्ट अलाहिदा. पण, स्त्री-पुरुषांत नैसर्गिक वितुष्ट आहे हे जर मान्य केले तर जहाल स्त्रीवाद्यांची सैद्धांतिक बैठक निदान व्यावहारिक शक्यतेच्या कसोटीला उतरते.


 ६. शेतकरी संघटनेची स्त्रीप्रश्नाची मांडणी

 

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६७