पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हत्याराची प्राथमिक ओळख होऊ लागलेला आणि शिकार किंवा अन्न गोळा करून जगणाऱ्या मानवांचा समाज.
 (२) दुसऱ्या युगात माणसाने जनावरे पाळण्याला आणि शेतीला सुरुवात केली. गरजेपेक्षा जास्त उत्पादन, त्यांचा व्यापार आणि शेती-व्यतिरिक्त कामांची सुरुवात व व्यापारी देवघेव या काळात झाली. याला "रानटी युग", "बर्बरतायुग" किंवा "पाषाणयुग" अशी शास्त्रीय पारिभाषिक नावे आहेत.
 (३) तिसऱ्या कालखंडाची सुरुवात नांगराच्या वापराने शेतीकामाला सुरुवात झाली तेव्हापासून धरण्यात येते. यालाच "संस्कृतियुग" म्हटले जाते.
 या प्रत्येक कालखंडाचे, बारकाव्याने अभ्यास करण्यासाठी आणखी पोटभाग पाडले जातात. पण कुटुंबव्यवस्थेच्या दृष्टीने या प्रत्येक कालखंडाची काही वैशिष्ट्ये आहेत.
 पोट भरणे आणि प्रजोत्पादन म्हणजे, अर्थ आणि काम या मनुष्यमात्रांच्या प्रेरणा आहेत. पण प्रजोत्पादन म्हणजे केवळ मुलांना जन्म देणे नाही. त्यांची योग्य तऱ्हेने वाढ करणे हेही त्यात सामावलेले आहे. योग्य तऱ्हेने वाढ म्हणजे पुन्हा नवीन पिढीला चांगल्या तऱ्हेने अर्थ आणि काम साधेल अशा पद्धतीने म्हणजे समाजातील उत्पादनाच्या व्यवस्थेला आवश्यक त्या प्रकारची आणि तितकी माणसे तयार करणे हे कुटुंबव्यवस्थेचे उद्दिष्ट असते.
 स्त्रीची दुय्यम भूमिकेकडे ढकलणूक
 पूर्वपाषण युगामध्ये सुरुवातीच्या काळाततरी लैंगिक संबंधावर कोणतीच बंधने नसावीत. पण हळूहळू वयोमानाप्रमाणे गट तयार होणे साहजिकच होते. त्याबरोबर, अगदी सहोदरांचे म्हणजे एकाच आईपोटी जन्मलेल्या भावा-बहिणींचे संबंध आणि त्यानंतर जवळपासच्या रक्ताच्या नातेवाईकांशी संबंध हे निकृष्ट, अवांछनीय, निंद्य मानले गेले आणि त्यांचा संततीवरचा दुष्परिणाम पाहता सर्वच समाजातून ते नष्ट झाले.
 स्वैर संबंधाची जागा आता समूहविवाहाने घेतली. म्हणजे, रक्ताच्या नात्याच्या पुरुषांचा एक गटच्या गट, रक्ताच्या नात्याच्या स्त्रियांच्या एका गटाशी संबंध ठेवू लागला. अशा गटाला कुल म्हणत. काही कुलांच्या ज्ञाती आणि ज्ञातींचे गण बनत. पण दिवसेंदिवस निरोगी अपत्य संभवाकरिता योग्य गोत्रीय जोडीदार मिळणे दुरापास्त होऊ लागल्यावर गटांचे संबंध दुर्मिळ होऊ लागले आणि एकएकट्या स्त्री-पुरुषांच्या मिथुनकुटुंबांना सुरुवात झाली.

 पूर्वपाषाण युगात आणि नवपाषाणयुगात, निदान गरजेपेक्षा जास्त वरकड उत्पादन हाती येईपर्यंत स्त्रियांची अवस्था काय होती याबद्दलही काही मतभेद

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६६