पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आले किंवा निम्म्या लोकांपैकी म्हणजे पुरुषांपैकी काही गट पुढे ठेवून मांडण्यात आले. आता उरलेल्या निम्म्या मनुष्यप्राण्यांची कैफियत मांडली जात आहे. तिच्या प्रकाशात बाकीच्या सगळ्या विचारधारांनी आपली शास्त्रीयता तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.


 ५. स्त्रीप्रश्नाचा इतिहास


 स्त्रीप्रश्नावर दोन प्रमुख मतप्रवाह, एक "मार्क्सवादी" तर दुसरा "स्त्रीवादी", हे आपण पाहिले. मार्क्सवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे मनुष्यजातीच्या सुरुवातीला जेव्हा समाज निसर्गावस्थेच्या निकट होता त्या वेळी बहुतेक समाजांत स्त्रियांचे प्राबल्य होते किंवा निदान त्यांना दुय्यम स्थानतरी नव्हते. इतिहासाच्या ओघात मधे एके काळी दररोजच्या गरजा पुरून वस्तू उरू लागल्या, टिकाऊ वस्तू तयार होऊ लागल्या तेव्हा त्यांच्या मालकीचा प्रश्न उपस्थित झाला आणि स्त्रीवरच्या बंधनांना सुरुवात झाली. काही काळानंतर साम्यवादी क्रांतीनंतर ही बंधने दूर होऊन पुन्हा एकदा स्त्री मुक्त होईल असे त्यांचे मत आहे.
 याउलट, स्त्रीच्या शरीरशास्त्रीय वैशिष्ट्यामुळेच तिच्यावर परावलंबी जीवन जगण्याची पाळी आहे, मनुष्यजातीच्या सर्व इतिहासात स्त्रियांची परिस्थिती हीच राहिली आहे आणि प्रजनन व मुलांची जोपासना यांच्या कचाट्यातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण यांच्या आधाराने सुटल्याखेरीज स्त्रीला मुक्तपणे जगण्याची आशा ठेवायला फारशी जागा नाही असा "स्त्रीवादी" विचार प्रवाह.
 मानव समाजाचा इतिहास
 मानव समाजाच्या इतिहासाचा अभ्यास म्हणजे प्राग्मानवसमाजशास्त्र. हे शास्त्र अजूनही एक बाल्यावस्थेतील शास्त्र आहे. निश्चित पुरावे मिळवण्यातील अडचणी आणि मिळालेल्या पुराव्यांचे लावता येण्यासारखे निरनिराळे, एवढेच नव्हे तर काही वेळा परस्परविरोधी अर्थ यामुळे आजही या शास्त्राच्या आधाराने अमुक-अमुक पद्धतीने समाजांचा विकास झाला असे ठामपणे सांगणे अशक्य आहे. पण आजपर्यंतच्या इतिहासाचे तीन भाग पाडणे सर्वच शास्त्रज्ञांना मान्य आहे.

 (१) पहिला जंगलातील जवळजवळ रानटी अवस्थेतील मानवसमाजाचा. यालाच "अरण्ययुग" किंवा "पूर्वपाषाणयुग" आणि काही वेळा "मृगया अन्नचयनयुग" असेही ओळखले जाते. जंगलात राहणारा समाज, दगडांच्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६५