पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुषनिरपेक्ष जग हे हास्यास्पद आहे हे नक्की. पण निदान, पुरुषार्थाच्या आक्राळविक्राळ विपरीत कल्पनांपासून तरी केवळ स्त्रियांचीच नव्हे तर पुरुषांचीही सोडवणूक करणे आवश्यक आहे.
 ही कल्पना सर्वांनाच मान्य होण्यासारखी नव्हती.
 मालक आणि गुलाम यांच्या गुणांचे मिश्रण म्हणजे नवा आदर्श होऊ शकत नाही (जेनिस् रेमंड)
 पुरुषांचे दुर्गुण पुरुषांनाच लखलाभ असोत. गेल्या कित्येक शतकांच्या दास्यातून स्त्रियांना दुर्दैवाने का होईना काही गुण अंगी बाणून घ्यावे लागले आहेत. पराधीनांना भावनाशीलता सहजच येते. स्वामीश्रेष्ठांचे रागलोभ त्यांना काही वेगळ्याच इंद्रियाने चटकन जाणवतात. या भावनाशीलतेच्या आधारावरच येणाऱ्या जगात स्त्री पुरुषापेक्षा श्रेष्ठ ठरेल.(जीन बेकर मिलर)
 मातृत्वाची जबाबदारी आणि त्याचे परिणाम हा सर्व स्त्री-चळवळीत वारंवार आढळणारा विषय आहे. मातृत्व स्वयंसिद्ध उदात्त अनुभव आहे. पुरुषी राजकीय आणि आर्थिक प्राबल्यामुळे मातृत्व हा शाप झाला आहे. (ॲड्रीयन रिच)
 स्त्रियांनी अजून स्वत:च्या शरीराचा आणि व्यक्तिमत्त्वाचा, मानसिक ताकदीचा, संवेदनक्षमतेचा, असाधारण बुद्धिमत्तेचा, सोशिकतेचा आणि विविधरम्य शारीरिकतेचा विचारही करायला सुरुवात केलेली नाही. या त्यांच्या सुप्त शक्तींचा थोडा तरी उपयोग झाला तरी जी ऐतिहासिक जगड्व्याळ क्रांती होईल तिच्यापुढे कोणत्याही समाजवादी क्रांतीची काहीच मातबरी राहणार नाही. स्त्रियांची स्वशरीरावरील सत्ता परत येणे हे कामगारांच्या हाती उत्पादनांच्या साधनांची मालकी येण्यापेक्षा समाज बदलण्यासाठी अधिक आवश्यक आहे. (ॲड्रियन रिच)

 आधुनिक स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या वेगवेगळ्या प्रवर्तकांनी आपापल्या देशात गाजविलेली कामगिरी पाहिली म्हणजे केवढी कर्तबगारी, बुद्धिमत्ता समाजात न फुलताच कोमेजून जात असेल याची कल्पना येते. स्त्री-आंदोलनाच्या पहिल्या स्फोटात शास्त्रीयतेच्या कठोर परिसीमा थोड्याफार उल्लंघिल्या जाव्यात हे समजण्यासारखे आहे. पाश्चिमात्य देशांच्या आजच्या परिस्थितीत स्त्री विरुद्ध पुरुष असा मूलगामी संघर्ष आहे अशी कोणी मांडणी केली तर तेही समजण्यासारखे आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भांडवशाहीतील प्रमुख संघर्षाबद्दल मार्क्सही असाच चकला होता. पण यापुढे स्त्री-मुक्ती विचाराला दुसऱ्या कोणत्या विचाराशी किंवा सिद्धांताशी जुळवून घेणे आवश्यक नाही. आजपर्यंतचे विचार मनुष्यजातीपैकी निम्मे लोकच डोळ्यासमोर ठेवून शिजवण्यात

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६४