पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि स्त्रियांचा मानसिकदृष्ट्या बीमोड करण्यासाठी या हत्याराचा वापर करण्यात आला. आधुनिक समाजात बलात्कारी गुन्हेगार संख्येने थोडे पण त्यांनी निर्माण केलेल्या धोक्याचा फायदा प्रत्येक पुरुष घेतो. बाहेरच्या बलात्काराला तोंड देण्यापेक्षा घरचे अत्याचार निमूटपणे सोसून घ्यायची प्रवृत्ती स्त्रीत तयार होते.
 बलात्काराचे तंत्र एका अर्थाने देशच्या देश नामोहरम करणाऱ्या साम्राज्यवाद्यांचेच आहे. (सुसान ग्रेफीन)
 बलात्कारासंबंधीच्या या मांडणीमुळे मार्क्सवाद आणि त्यातील वर्गविग्रहाची मध्यवर्ती कल्पना यापासून स्त्री-मुक्ती चळवळ दूर सरकली. त्याचबरोबर वंशभेदाच्या सर्व वादांपासूनही ती दूर झाली. बलात्काराला वर्गाच्या मर्यादा नाहीत आणि वंशाच्याही नाहीत.
 स्त्री-मुक्तीच्या संकल्पना सुचवतानासुद्धा अगदी निर्भीड नि:संकोचपणे काही अतिरेकी कल्पनासुद्धा चर्चेसाठी मांडल्या गेल्या.
 कामगारांच्या चळवळीत साम्यवादाचे जे स्थान आहे तेच स्थान स्त्री-चळवळीत स्त्रियांतील समसंभोगाचे आहे. (टाय्-ग्रेस ॲट्किन्सन)
 ही संकल्पना अतिरेकी तर खरीच आणि स्त्री-चळवळीतही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झाली, पण स्त्रियांना पुरुषनिरपेक्ष जगता आले पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा त्यामुळे पुढे मांडला गेलाच.

 अगदी मानसशास्त्रासारख्या शास्त्रानेदेखील स्त्रीविरुद्ध भाकडकथा रचल्या आहेत. स्त्रीने कसे वागले पाहिजे, स्त्रीची निरोगी वर्तणूक कोणती याच्या पुरुषी संकल्पना मनोविकारतज्ज्ञही वापरतात. एखादी कर्तबगार बुद्धिमान स्त्री आयुष्यात जरा कोठे नवीन वाट शोधू लागली की, "तुझे वागणे स्त्रीत्वाला धरून नाही, यामुळे तुला मानसिक ताण सहन करावे लागतील." असा इतका धाक दाखविला जातो की ती खरोखरच मनोरुग्ण व्हावी. एखाद्या मुलाने जरा कुठे ऋजुता, ममता, नाजूकपणा दाखविला तर त्याचीही हेटाळणी व्हायला आणि त्याच्या पौरुषाविषयी शंका घ्यायला वेळ लागत नाही. स्त्री-पुरुष यांच्या आदर्शात पुरुषसत्ताक व्यवस्थेने अनैसर्गिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे. अशा ध्रुवीकरणाला जीवशास्त्रीय आधार काही नाही. जीवशास्त्राच्या दृष्टीने स्त्री व पुरुष हा फरक काही टक्केवारीचा आहे. फिलीस चेझलर, कॅरोलिन हेलब्रून, आर्ना सॅण्डा बेम यांनी संतुलित व्यक्तिमत्त्वाची नवी संकल्पना मांडली. पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या मानसिक परीक्षा करण्यासाठी हा नटेश्वराचा आदर्श होता. स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही शौर्य, धैर्य, पराक्रम तसेच ममता, प्रेम, सहनशीलता हे गुणही दाखविण्यास ही नवीन संकल्पना वाव देते.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न /६३