पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दमनशक्ती, दबाव, रूढी, परंपरा, कायदा, भाषा, शिष्टाचार, शिक्षण आणि श्रमविभागणी यांचा वापर करून स्त्रियांचे समाजातील स्थान दुय्यम ठरवते. (ॲड्रीयन रिच.)
 जन्मजात लिंगभेद आणि स्त्रीला देण्यात आलेली समाजातील भूमिका यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. सर्व पुरुषांनी मिळून सर्व स्त्रियांवर लादलेली ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. समाजातील हरएक साधनाचा उपयोग करून पुरुषी प्रचाराने आणि फितूर झालेल्या वयस्कर स्त्रियांच्या साहाय्याने ही व्यवस्था राबविली जाते. (एलिझाबेथ जेन्वे).
 शुलामिथ फायरस्टोनने पितृसत्ताक व्यवस्थेची उपपत्ती वस्तुवादाच्या आधाराने सांगितली. पण हा मार्क्सएंगल्स्चा आर्थिक वस्तुवाद नाही तर स्त्री-पुरुष यांच्या शरीरशास्त्रीय वास्तवावर आधारलेला वेगळाच वास्तववाद आहे.
 स्त्री-पुरुषांच्या जन्मजात फरकाने नव्हे तर प्रजननसंबंधी जबाबदाऱ्यांच्या वेगळेपणामुळे लिंगवर्ग आणि स्त्रियांचे शोषण उद्भवले. जीवशास्त्रीय कुटुंबाचे घटक चार- १. स्त्रियांचे पुरुषांवर परावलंबित्व. २. माणसाची पोरे स्वतंत्र होण्याकरिता लागणारा दीर्घ काळ. ३. आईबाळाच्या खास नात्यामुळे होणारे मानसिक परिणाम. आणि ४. स्त्री-पुरुषांतील श्रमविभागणी. स्त्री-मुक्ती ही जीवशास्त्रीय कुटुंब नष्ट केल्यानेच होऊ शकेल. कृत्रिम प्रजोत्पादन, मुलांच्या जोपासनेसाठी सार्वजनिक व्यवस्था प्रस्थापित केल्यानेच स्त्री स्वतंत्र होऊ शकेल हा विचार एकांगी आहे.
 स्त्री-मुक्तीसाठी किमान चार आघाड्यांवर बदल घडवून आणावा लागेल. १. आर्थिक उत्पादनातील स्त्रीची भूमिका. २. प्रजोत्पादन ३. लैंगिकता आणि ४. मुलांची सार्वजनिक देखभाल (ज्युलिएट मिचेल).
 मिशेल रोझाल्डाचे मत थोडे वेगळे आहे.
 बाळंतपणाच्या जबादारीपेक्षा मुले वाढविण्याची जबाबदारी नैसर्गिक रितीने स्त्रियांवर पडते आणि त्यामुळे इतिहासातील यच्चयावत् समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान मिळाले आहे. याउलट, पुरुषांची घरकामापासून आणि मुलांपासून दूर राहू शकण्याची ताकद हे त्यांचे महत्त्वाचे सामर्थ्य आहे.
 प्रजनन किंवा मुलांची जोपासना यामुळे स्त्रीवर बंधने पडतात या विचारापेक्षा अगदी वेगळा विचार सुसान ब्राऊनमिलर हिने मांडला.

 पुरुषी सत्तेचे खरे रहस्य पुरुषांची पाशवी शक्ती हेच आहे. सर्व प्राणीजगतात मनुष्य प्राण्यातच बलात्कार शक्य होतो. कामपूर्तीसाठी त्यांना कोणत्याही ऋतूची आवश्यकता नसते हे पुरुषांच्या एकदा ध्यानात आल्यानंतर शत्रूचा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ६२