पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाहीत? या प्रश्नावरही मार्क्सवादी अर्थशास्त्र कोलमडून पडते. भांडवलदार वर्गाकडून होणाऱ्या शोषणाच्या क्षेत्रात घरकामाचे श्रम मोडत नाहीत असे म्हटले तर स्त्रियांची स्त्रिया या नात्याने होणारी दडपणूक किंवा शोषण हे भांडवली शोषणाचा अंगभूत भाग असणार नाही. मग स्त्रियांची पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे होणारी दडपणूक भांडवली चौकटीमध्येच संपू शकते असा किंवा भांडवली व्यवस्था नष्ट झाल्यानंतरही संपत नाही असा निष्कर्ष निघतो.
 घरकामाचे श्रम उत्पादक असतात आणि म्हणून भांडवली शोषणाचा भाग असतात असे धरले तरी अडचणी संपत नाहीत. कामगारांच्या श्रमशक्तीचे मूल्य हे त्याच्या जीवनासाठी आणि पुनरुत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व क्रयवस्तूंच्या मूल्याइतके असते हा मार्क्सचा मूलभूत सिद्धांत आहे. कामगार खानावळीत जेवले तर खानावळीचे पैसे - ज्यांत स्वयंपाक्याचे, मोलकरणीचे, वाढप्याचे वेतन अंतर्भूत असते या मूल्यात मोजता येतात; पण घरकाम करणाऱ्या बायकोला वेतन नसल्यामुळे तिच्या श्रमाचे मूल्य त्यात धरता येत नाही. मार्क्सची मूल्यमीमांसा ही किती अजागळ आहे याबद्दल अर्थशास्त्र्यांचे फार काळापासून एकमत आहे. स्त्री-चळवळीच्या संबंधाने ही गोष्ट आणखीनच स्पष्ट झाली. एरवी हा भाग विनोदाचाच.
 (४) घरकामाचे सार्वजनिकीकरण
 आर्थिक घटक म्हणून कुटुंबाचे अस्तित्व साम्यवादी व्यवस्थेत नष्ट होईल पण त्याच वेळी युगुलसंबंधांचे आदर्श रूप म्हणून कुटुंब साकार होईल या दोन कल्पना परस्परविरोधी आहेत. घरकाम समजल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आणि कामे ही एक अर्थाने विस्तारित कामक्रीडेचाच भाग असतात. गृहव्यवस्थेतील आर्थिक क्षेत्र आणि लैंगिक अंगे यांना वेगळे करणे अशक्यप्राय आहे. स्त्री-मुक्ती ही सर्व घरकामाचे सार्वजनिकीकरण करण्याने येणार असेल तर रोगापेक्षाही औषध भयानक असा प्रकार होईल. स्त्री सार्वजनिक उत्पादनक्षेत्रात आल्यामुळे तिचे प्रश्न सुटतात असे म्हणणे म्हणजे गेल्या क्रांतीनंतरच्या सत्तर वर्षांत सोव्हिएट स्त्रीचे सर्व प्रश्न सुटले आहेत असे म्हणण्यासारखे आहे.

 सार्वजनिकीकरणाने स्त्री-मुक्तीचा मार्ग मोकळा होईल असे एका बाजूला मार्क्सवादी सांगत असताना दुसऱ्या बाजूला साम्यवादी म्हणवणाऱ्या देशांत उत्पादनक्षेत्रात वाढते खासगीकरण करण्याची प्रवृत्ती अधिकृतपणे बळावत आहे. सत्तर वर्षांच्या साम्यवादी नियोजनानंतर सार्वजनिकीकरणाचा मार्ग सोडून देणे साम्यवादी नियोजकांना अपरिहार्य वाटू लागले असेल तर "सार्वजनिकीकरणातून स्त्री-मुक्ती" हे एक मृगजळ होते असे मानावे लागेल.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५९