पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण नाही. मार्गारेट मीड इत्यादिनी केलेल्या संशोधनात, वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये कामाची अगदी वेगवेगळ्या पद्धतीची विभागणी आढळून आलेली आहे. काही स्त्रियांमध्ये किंवा बहुतांश स्त्रियांमध्ये कदाचित् घरकामाची आवड असेलही. प्रजजनासंबंधी जबाबदाऱ्या लक्षात घेता व त्यामुळे हालचाल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही काळ स्त्रियांना निवारा व संरक्षण यांची गरज आहे असे मानले तरी त्यामुळे सगळ्या स्त्रियांना सर्व काळ घरकामातच ठेवण्याची व्यवस्था का निघाली? किंवा स्त्रीपुरुषांची जीवशास्त्रीय वैशिष्ट्ये लक्षात घेताही, सरसकट लिंगभेदावर आधारित श्रमविभागणी का व्हावी या प्रश्नाचे एंगल्सचे उत्तर अपुरे आहे.
 (२) स्त्री आणि वर्ग
 मार्क्सवादी विचार हा वर्गसंघर्षाचा विचार आहे. वर्गाची निश्चित व्याख्या देण्याचे मार्क्सनेही टाळले आहे आणि एंगल्सही सुस्पष्ट व्याख्या देत नाही.
 "मिळकतींच्या उगमांची आणि स्वरूपांची समानता" या पलीकडे जास्त स्पष्टता नाही. "आहे रे" वर्गाची व्याख्या त्या मानाने सोपी आहे. उत्पादनांच्या साधनांवरील मालकीचा आणि अतिरिक्त मूल्यांचा लाभ घेण्याची ताकद ज्या वर्गाजवळ असेल तो "आहे रे". पण क्रांतिप्रवण वर्गाची खूण मिळकतीच्या स्वरूपावरून ठरवणे कठीण आहे. आधुनिक मार्क्सवादी समान हितसंबंधांची जाणीव आणि एकजूट करण्याची प्रवृत्ती व ताकद हीच वर्गाच्या व्याख्येची महत्त्वाची अंगे समजतात. या व्याख्येने तपासता वर्गविग्रह इतिहासात कधी दृष्टोत्पत्तीस आला किंवा नाही याबद्दलही शंका घेण्यास जागा आहे. वर्गाचे अस्तित्व मानले तरी एकाच घरातील स्त्रीपुरुष एकाच वर्गाचे घटक आहेत हे म्हणणे कोणत्याही व्याख्येने कठीण आहे. एकीकडे चार भिंतींच्या आतील उत्पादनांच्या साधनांचा मालक आणि अतिरिक्त मूल्याचा स्वामी तर दुसरीकडे सर्वार्थाने सर्वहारा, गुलामांची गुलाम स्त्री. पण या दोघांत बाहेरच्या संघर्षाला तोंड द्यायचे झाले तर एकजुटीने लढण्याची प्रवृत्ती. ही कुटुंबाची रचना वर्गाच्या संकल्पनेचा पायाच उखडणारी आहे. राष्ट्राराष्ट्रांमध्ये शोषकांच्या फायद्यासाठी लढाया होतात. पण प्रत्येक राष्ट्रातले सर्वहारा शोषित आपापल्या देशातील शोषकांच्या बाजूनेच ठामपणे उभे राहतात. त्याप्रमाणे सर्व संकटांना तोंड देण्याकरिता पतीपत्नींची होणारी एकजूट ही आर्थिक वर्गाच्या कल्पनेलाच नाकारणारी आहे.
 (३) घरकामाचे श्रममूल्य

 स्त्रीच्या घरकामाचे स्थान काय? घरातील तिचे श्रम उत्पादक आहेत किंवा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५८