पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 स्त्रीप्रश्नावरची सुसंगत मांडणी एंगल्सने केली. आदिमानवाच्या समाजातील व्यवस्था ही अनेक जोडप्यांची साम्यवादी व्यवस्थाच होती. स्त्रियांकडे त्यांच्या नैसर्गिक गुणधर्माप्रमाणे "घरकाम" आले हा श्रमविभागणीचा भाग होता. पण घरकामाचे स्वरूप सामाजिक गरज भागविणाऱ्या सार्वजनिक उद्योगाचे होते. पुढे जोडप्यांची कुटुंबव्यवस्था तयार झाली त्या वेळी घरकाम एक खासगी सेवा बनली आणि आपली मालमत्ता आपल्याच जैव वारसाकडे जावी याकरिता स्त्रियांवर लैंगिक आणि आर्थिक-सामाजिक बंधने घालण्यात आली. म्हणजे, खासगी मालमत्ता हे स्त्रीच्या गुलामगिरीचे प्रथम कारण. प्रत्येक पुरुष, बाहेरच्या जगात तो मालक असो का मजूर, चार भिंतीच्या आत "सुलतान" बनला आणि त्याची स्त्री त्याची "गुलाम". स्त्रीची मुक्तता केव्हा होईल? एंगल्स म्हणतो, "सर्व स्त्रीजात जेव्हा घराबाहेर पडून पुन्हा एकदा सार्वजनिक उत्पादनात सहभागी होईल त्यावेळी आजच्या कुटुंबाचे 'आर्थिक घटक' हे स्थान नष्ट होईल."
 कामगार चळवळीची सोय
 स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी मार्क्सवादाने मांडलेल्या भूमिकेचा फार मोठा प्रभाव स्त्रीकार्यकर्त्यांवर राहिलेला आहे. किंबहुना, स्त्रियांची चळवळ ही प्रामुख्याने डाव्या चळवळीचे एक अंग या स्वरूपातच दिसते.
 स्त्रीकार्यकर्त्यांनी कामगार चळवळीत मोठ्या हिरीरीने भाग घेतला. तत्कालिक कायद्याच्या अर्थवादी मागण्यांच्या यादीत स्त्री-प्रश्नांच्या जाणिवेने काही भर पडली. समान काम समान वेतन, बाळंतपणाची रजा, पाळणाघरे, स्त्री- कामगारांसाठी वेगळी विश्रामगृहे, कामाच्या जागी अल्पखर्चात भोजनाची सोय इत्यादी मागण्याही आता कामगारांच्या मागण्यांच्या यादीत सामील होऊ लागल्या. कामगार चळवळीच्या अंतिम यशातच म्हणजे भांडवली व्यवस्था आणि खासगी मालमत्ता यांच्या नाशातूनच स्त्री-स्वातंत्र्याचा मार्ग जातो असे म्हटल्यानंतर स्त्रीकार्यकर्त्यांची पलटण कामगार लढ्याच्या दिमतीला उभी राहू लागली आणि स्त्रियांनी कामगार म्हणून केलेल्या चळवळीच स्त्री-मुक्ती चळवळी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
 (१) घरकाम = स्त्री?

 घरकाम स्त्रियांकडे त्यांच्या जीवशास्त्रीय गुणधर्माप्रमाणे झालेल्या श्रमविभागणीने आले हे म्हणणे आता जीवशास्त्रालाही मान्य होणार नाही आणि प्राग्मानवसमाजशास्त्रातील पुराव्यांचाही त्याला पाठिंबा नाही. घरकाम प्रत्येक समाजात सर्व काळी अपरिहार्यपणे स्त्रियांकडेच राहावे असे समजण्याचे काहीही

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५७