पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यापेक्षा कितीतरी अधिक वस्तू तयार होतात. या शोषणाचा परिणाम म्हणून एका बाजूला मंदीच्या लाटा अपरिहार्यपणे तयार होतात, तर दुसऱ्या बाजूला पिळल्या जाणाऱ्या सर्वहारा कामगारवर्गात जागृती तयार होऊन भांडवली व्यवस्था व खाजगी मालमत्ता यांचा अंत होतो आणि वर्गविहीन, शोषणरहित समाज तयार होतो अशी मार्क्सवादाची थोडक्यात मांडणी आहे.
 अगदी सुरुवातीच्या काळापासून मार्क्स आणि एंगल्स इतकेच नव्हे तर लेनिनपर्यंत विचारवंतांनी स्त्रियांच्या प्रश्नासंबंधी मते मांडली. त्या सगळ्या मतांमध्ये एकसूत्रता सापडतेच असे नाही. आधुनिक स्त्री-मुक्ती आंदोलनातील अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवाद हीही एक पुरुषी विचारपद्धती आहे आणि कामगारांच्या कोणत्याही क्रांतीपेक्षा सर्व जगातील, लोकसंख्येने अर्ध्या असलेल्या स्त्रियांची क्रांती ही जास्त व्यापक आणि महत्त्वाची आहे असे आग्रहाने मांडले. स्त्री-मुक्ती आंदोलनाचे एक श्रेय विरोधकांनाही मान्य करावे लागेल. मार्क्सवाद्यांना त्यांच्या मूल ग्रंथातील विचारांच्या अचूकपणाबद्दल आणि शास्त्रीयतेबद्दल कडवा अभिमान असतो. वेदोपनिषदांचे आधार सांगणाऱ्या ब्राह्मण पंडितांपेक्षाही त्यांचे ग्रंथप्रामाण्य मजबूत असते. पण मार्क्सवादी विचारात स्त्री-प्रश्नाबाबतीत काही कमतरता कदाचित असू शकेल असा बचावात्मक पवित्रा घेणे त्यांना आधुनिक स्त्रीवाद्यांमुळे भाग पडले आहे.
 साम्यवादी जाहीरनामा
 साम्यवाद्यांच्या जाहीरनाम्यात स्त्रियांच्या प्रश्नाचा उल्लेख पहिल्यांदा सापडतो. मार्क्सने आपल्या जळजळीत उपहासाच्या शैलीत भांडवलशाही कुटुंबव्यवस्थेतील दांभिकता आणि अमानुषता यावर आसूड ओढले आहेत. कुटुंबव्यवस्था ही फक्त "आहे रे" (संपन्नां)ची मक्तेदारी आहे. याउलट, कामगारांना हे भाग्य जवळपास नाही आणि त्याउलट, खुले आम वेश्यव्यवसाय पसरलाय. या व्यवस्थेत पालक मुलांचे शोषण करतात आणि स्त्रिया या केवळ उत्पादनाची साधने बनतात आणि "आहे रे" मंडळी केवळ "नाही रे" च्या स्त्रियांवर अत्याचार करतात एवढेच नव्हे तर एकमेकांच्या स्त्रियांबरोबर व्यभिचार करतात असा त्यांनी आरोप केला आहे. भांडवल नष्ट झाले म्हणजे "नाही रे" ची कुटुंबहीनता व वेश्याव्यवसाय नष्ट होईल आणि त्याचबरोबर "आहे रे" ची कुटुंबव्यवस्था अपरिहार्यपणे नष्ट होईल. मार्क्सवादी व्यवस्थेत स्त्रियांवर सामायिक मालकी प्रस्थापित होईल या कल्पनेची मार्क्स खिल्ली उडवतो आणि भांडवली व्यवस्थेतच अशा तऱ्हेची सामायिक मालकी असल्याचे प्रतिपादन करतो.

 एंगल्सकृत मांडणी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५६