पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जिनसेला, दुसरा त्याच जोडीचा मुकाबला असतो. त्यावाचून शोभा येतच नाही."
 भूमिकेतील फेरफार
 मग पुन्हा प्रश्न शिल्लक राहतो तो हा की स्त्रीपुरुषांचे समाजातील परस्पर संबंध ठरतात तरी कोणत्या कारणाने ?
 (१) काही जीवशास्त्रीय बदल घडले तर स्त्रिया व पुरुष यांचे समाजातील परस्पर स्थान बदलल्याखेरीज राहणार नाही. अगदी विज्ञानकथांच्या जगात जायचे तर माणसांच्या पिलांचा जन्म हा स्त्रीला गर्भभार वाहावा न लागता होऊ शकला तर स्त्रियांच्या परिस्थितीत केवढा तरी फरक पडेल. अल्डस हॅक्सले याच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' मध्ये अशा समाजाचे तपशीलाने वर्णन केले आहे. पाळीपाळीने गर्भधारणाची जबाबदारी पुरुषांवर येत असती तरी समाजाचे चित्र वेगळे दिसले असते.
 (२) इतके आमूलाग्र बदल सोडून दिले तरी काही छोट्या बदलांनीसुद्धा स्त्रियांची परिस्थिती बदलू शकते. उदाहरणार्थ, स्त्रीपुरुष हे केवळ गर्भधारणेकरिता एकत्र येत नाहीत. चतुष्पाद प्राण्यांप्रमाणे मादीची शारीरिक तयारी स्त्रीपुरुषांना एकत्र येण्याकरिता आवश्यक नाही. त्यांची कामभावना सर्व ऋतुंत जागी असते. प्राण्यांप्रमाणेच स्त्री-पुरुषांची कामवासना काही ऋतुतच जागृत होत असती तरी समाजाची रचना अगदी वेगळी झाली असती. दोन ऋतुंमधील काळात स्त्री पुरुष एकत्र संसारात राहणे असंभव झाले असते.
 (३) मानवजातीत स्त्रीपुरुषांच्या शारीरिक ठेवणींमुळे लैंगिक बळजबरीचा प्रयोग होऊ शकतो. बलात्काराची शक्यता व धोका आणि त्याचे शारीरिक व मानसिक परिणाम लक्षात घेऊन समाजातील अनेक रचना तयार झाल्या आहेत.
 (४) गर्भधारणेवर इतिहासाच्या बहुतेक काळात स्त्रियांचे काहीच नियंत्रण राहिलेले नाही. कुटुंबनियोजनाची तांत्रिक शक्यता आणि हे तंत्र व्यवहारात वापरण्याची संभाव्यता जितकी वाढेल तितकी स्त्री स्वत:च्या भवितव्याची स्वामिनी बनू शकेल.

 (५) निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या आदिवासी स्त्रिया आणि त्यांची सहजसुलभ प्रसूती याबद्दल पुष्कळ लिहिले गेले आहे. पण बाळंतपणे, विशेषतः पहिली बाळंतपणे परवापरवापर्यंत जीवावरची दुखणीच होती. प्रसूती ही अगदी अलीकडे आधुनिक वैद्यकाच्या सोयी सवलती उपलब्ध असलेल्या थोड्या भाग्यवंतांकरिता सुलभ झालेली आहे. या सोयीसवलती जितक्या दूरवर आणि सर्वसामान्य स्त्रीला उपलब्ध होतील, त्या प्रमाणात बाळंतपण आणि गर्भारपण

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ५१