पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ३. स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान
 निसर्गाची योजना पाहिली तर स्त्रियांना आजची हलाखीची स्थिती प्राप्त होण्याचे काहीच कारण दिसत नाही. पुरुषांत आणि स्त्रियांत शेवटी फरक दिसले कोणते?
 (१) स्त्रियांवर गर्भधारणा आणि नव्या पिढीला जन्म देणे व तिची जोपासना करणे या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या अनुषंगाने तिची शारीरिक आणि मानसिक रचना आहे. आक्रमकता, हिंसाचार यात ती सहज भाग घेत नाही. पण प्रसंगी स्वत: झीज सोसूनही गर्भाची जोपासना करणे, काटकपणा, सोशिकता, धीरगंभीरता, ममता हे गुण स्त्रियांमध्ये सहजपणे आढळतात.
 (२) स्त्रियांमध्ये शाब्दिक अभिव्यक्तीचे सामर्थ्य आहे तर पुरुषांच्या तुलनेने मितिज्ञान काही प्रमाणात कमी पडते.
 (३) मुली वयात लवकर येतात त्यामुळे त्यांच्या जोडीदाराशी त्यांचे संबंध सहजपणे असमानतेचे असतात. याच कारणाने मुलींना शिक्षणासाठी अवधी थोडा कमी मिळतो. उंची, आकारमान आणि शारीरिक सामर्थ्य यात त्यांचे कमीपण ही वस्तुतः गंभीर बाब नाही. (ॲम्बॅसेडर गाडी आणि फियाटगाडी यांची तुलना केली तर आकाराने मोठी, जास्त धावू शकणारी, म्हणजे ॲम्बॅसेडर गाडीच जास्त श्रेष्ठ असे म्हणता येणार नाही. या उलट लहान आकाराची, जास्त टिकणारी, कमी पेट्रोल खाणारी अशी फियाट गाडी अनेकांना पसंत असते.) थोडक्यात, जीवशास्त्रीय कारणासाठी स्त्रीला आजची अवस्था प्राप्त होण्याचे काहीही कारण नाही.
 निसर्गाने स्त्री-पुरुषांची योजना ही एकमेकांशी संघर्ष करण्यासाठी किंवा एकमेकांवर मात करण्यासाठी केली असावी हेही शक्य नाही. निसर्गामध्ये कोणत्याही योनीत अशा संघर्षाची योजना दिसत नाही. प्रजनन हा निसर्गाचा प्रधान हेतू सर्वत्र दिसतो. स्त्री-पुरुष तत्त्वे एकत्र यावीत आणि त्यातून निर्मिती व्हावी यासाठी निसर्ग अद्भुत वाटावा असा खटाटोप सातत्याने चालवत असतो. मनुष्यजात नष्टच व्हावी अशी निसर्गाची योजना नसेल तर स्त्री-पुरुष निसर्गाने परस्पर पूरक म्हणूनच योजले असले पाहिजेत. १८८२ साली ताराबाई शिंदे यांनी त्यांच्या 'स्त्री-पुरुष तुलना' या प्रसिद्ध पुस्तिकेत म्हटल्याप्रमाणे

 "ईश्वराने हा जोडा स्वेच्छेनेच नेमिला आहे. पाहा, पक्ष्यांपासून तो निर्जीव झाडाझुडपांतदेखील त्याने स्त्रीजाती निर्माण केलेली आहेच. प्रत्येक गोष्टीला,

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न /५०