पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उपलब्ध आहेत. तेथेही घरातील स्त्रियांना सुखाचे दिवस आलेले दिसत नाहीत.
 १) पंजाबमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळू लागल्यानंतर गावातील दारू पिण्याचे प्रमाण वाढले, अंधार पडल्यानंतर गावात इतके असुरक्षितेचे वातावरण तयार झाले की संध्याकाळनंतर आता बायका, कर्फ्यू असल्याप्रमाणे, घरात बसून राहतात.
 २) पतियाळातील दलित स्त्रीचा अनुभव असा की आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांची पूर्वीची मजूर म्हणून असलेली स्वायत्तता गेली आणि पुरुषवर्गाने मध्यमवर्गीयांच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या स्त्रियांवर नवीन बंधने लादली.
 ३) पंजाबमध्ये आता मध्य प्रदेश व बिहारमधील शेतमजूर कामाला जातात. त्याचे एक कारण, आता तेथील स्त्रियांना घरची मंडळी कामावर जाऊ देत नाहीत.
 ४) संथाळ परगण्यात आदिवासी जमातीतील स्त्रियांना पुष्कळ स्वातंत्र्य असे. वेगवेगळे कारखाने आणि खाणकाम सुरू झाल्यानंतर त्या निमित्ताने आलेल्या बाहेरच्या पुरुषांच्या विकृत दृष्टीमुळे या जमातीत स्त्रियांना पडद्यात ठेवण्याची पद्धत सुरू होते आहे.
 ५) शहरातील मध्यम, अगदी उच्चमध्यम वर्गातील स्त्रियांचाही, आसपासची वाढती असुरक्षितता आणि चौकोनी कुटुंबाची मर्यादा यामुळे, असह्य कोंडमारा होतो.

 महामनुंचे कारस्थान
 स्त्रीची ही कुत्र्यासारखी अवस्था का?
 "स्त्री म्हणजे खोटेपणा, साहस, माया यांचे रूप. लहानपणी बाप, तरुणपणी नवरा, म्हातारपणी मुलगा यांच्यावर स्त्री अवलंबून असावी. स्वतंत्रपणे जगण्याची तिची पात्रताच नाही." असे भलेभले महामनु सांगून गेले. संतांनीही स्त्री म्हणजे पाप, स्वर्गाच्या मार्गातील धोंड, पुरुषाला सन्मार्गापासून दूर नेणारी मायावी शक्ती अशी तिची हेटाळणी केली.

 प्राणिमात्रात श्रेष्ठ जन्म मनुष्याचा. पण मनुष्याचा म्हणजे पुरुषाचा. स्त्री ही वेगळी, कमी प्रतीची. अगदी भगवद्गीतेतही स्त्री, वैश्य आणि शूद्र यांना कृष्णाने एका माळेत गुंफले आहे. अगदी मार्क्सवाद्यांनासुद्धा स्त्री आणि पुरुष यातील फरक महत्त्वाचा वाटतो. या सगळ्यात एक महत्त्वाचा अपवाद म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. युरोपसारख्या पुढारलेल्या खंडातील मोठमोठ्या शास्त्रज्ञांना जी गोष्ट अलीकडे, अलीकडे समजू लागली ती ज्योतिबांनी १८८९

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४४