पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/45

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पडली तर ७ वीतली मुलगी शाळेतून काढून घरकामाला घरी बसवतात. २१ वर्षाचा तिचा भाऊ धाकट्या बहिणीला मदतसुद्धा करत नाही.
 * पोरींना आयांचा दुःस्वास फार. पोरीची जात. दुसऱ्या घरी जायची, धडपणे जाऊ दे या चिंतेने आयाही जळत राहतात आणि पोरींचं बालपणही करपवून टाकतात.
 * जरा मोठी झाली की शाळा बंदच. १८ वर्षांनंतर लग्न हा केवळ पुस्तकी कायदा. कोणाच्या पदरी जायचं हे मुलींना विचारायची गरजसुद्धा वाटत नाही.
 * लग्नाच्या दिवसाच्या आसपासच भाऊ बहिणींकडून संमती लिहून घेतात आणि तिचा जमिनीचा वाटा हडप करतात. बिचारी माहेरच्यांना लग्नाच्या निमित्ताने आलेला खर्च पाहून दबून गेलेली असते, सही/अंगठा देऊन टाकते.
 * शहरातल्या मुली जाळून घेऊन जीव देतात किंवा जाळून मारल्या जातात त्याचा वर्तमानपत्रात गवगवा होतो, खटले होतात. ग्रामीण भागात घासलेट महाग, पण ज्या आडात "पाय घसरून" पोरी पडल्या नाहीत असा आड दुर्मिळ आणि पडणाऱ्या सर्व बायाच. पुरुष माणसं क्वचितच.
 * सगळं काही ठीक चाललं तरी दारूची ब्याद कधी उपटेल आणि ज्याच्या आधाराने माहेर सोडलं तोच हाणायला, मारायला सुरुवात करील हे सांगणं कठीण. कुठं बोलायची सोय नाही. पुरुष माणूस आपल्याच बायकोला मारतो आहे म्हटलं की मधे कुणी पडतसुद्धा नाही.
 * घरातून काढून लावणं अगदी सोपं. तीनदा 'तलाक' म्हणायचीसुद्धा गरज नाही. बहुतेक वेळा फक्त नेसत्या वस्त्रांवरच बाहेर पडायचं. परतायला दुसरी जागाच नाही, भावा-भावजयीच्याच दारात उभं राहायला पाहिजे.
 * भाऊ मायेचा म्हणून पोटाला तरी भेटतंय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबते तरी चार पैसे गाठीला जमले नाहीत. भावाचं वय झालं, त्याच्या पाठीमागं माझं काय व्हायचं?
 कोणत्याही आकडेवारीपेक्षा हे अनुभव खरं चित्र दाखवून जातात. पिढ्यान् पिढ्या शेतकरी बायांनी आपली दुःखं जात्याला सांगितली-

  "अस्तुरी जलमा नको घालू शिरीहारी
 रान ना दिस परायाना ताबेदारी।"


 विकासातूनही बंधने

 शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याची जी काही थोडी उदाहरणे

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४३