पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याबाहेर पडली तर ती श्रमाच्या कामात आणखीनच भरडली जाते वगैरे कल्पना वारंवार मांडल्या जातात. पण या शब्दांनी आणि वाक्यांनी स्त्रियांच्या अवस्थेची फार अस्पष्ट जाणीव होते.
 काही दिवसांपूर्वी "नैरोबी" येथे संपूर्ण जगातल्या स्त्रियांच्या संस्थांची एक परिषद झाली. या निमित्ताने काही आकडेवारी दिली गेली. जगाच्या लोकसंख्येच्या ५० टक्के स्त्रिया आहेत. पण त्या एकूण कामाच्या २/३ काम करतात. तरीही कामाच्या एकूण मोबदल्यापैकी फक्त १० टक्के स्त्रियांच्या वाट्याला येतो. म्हणजे १/३ काम करणाऱ्या पुरुषांना ९० टक्के मिळकत. शेतीकडे पाहायचे झाले तर निम्मी जमीन स्त्रिया कसतात. पण स्त्रियांच्या मालकीची अशी जमीन रुपयात पैसासुद्धा नाही.
 जितका देश गरीब तितकी बायकांची परिस्थिती आणखीनच बिकट. भारतासारख्या देशात अनेकांना पोटाला पुरेसे नाही. मग त्यात स्त्रियांच्या वाट्याला आणखी कमी. केवळ पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे रातांधळेपणासारखे रोग जास्त करून मुलींना आणि बायकांनाच झालेले आढळतात. कायमचा मतिमंदपणा यावा इथपर्यंत स्त्रियाचं कुपोषण होते. अगदी साधा आजार झाला तर मुलगा किंवा पुरुष असला तर त्याला इस्पितळात नेण्यात येते. शेतकऱ्याच्या घरच्या बाईला इस्पितळात नेले म्हणजे ते शेवटच्या अवस्थेत. मुंबईतले सरकारी इस्पितळातील आकडेवारी लक्षात घेता, ग्रामीण भागातून भरती झालेल्या फारच थोड्या स्त्रिया वाचविण्याच्या अवस्थेतल्या असतात. हे आकडे आणि अहवाल खूप बोलके आहेत. पण खऱ्या परिस्थितीची दाहकता ही शेतकरी स्त्रियांच्या तोंडूनच ऐकायला पाहिजे. संघटनेच्या वेगवेगळ्या शिबिरांत अनेक महिलांनी आपले अनुभव सांगितले.
 *  पोरगी जन्मली तर आईला धड कोणी विश्रांतीही घेऊ देत नाही. पोरगा जन्मला तर बाईला त्यातले त्यात चांगलंचुंगलं खायला देतात. पोरगी झालेली आई दिवसा-दोन-दिवसांत उठते आणि कामाला लागते. पोरींचा पिंड पक्का म्हणून जगतात.
 * मुलां-मुलींत उजवं डावं फार. जरा काही वेगळं खायला असलं तर पोरग्याला उजव्या हाताने. तूप दुर्मिळ ; पण उजव्या हातानं चमचा पोराच्याच भाकरीवर. अगदी एका भांड्यातलं दही वाढायचं झालं तर वरचं सायीचं दही पोराला आणि खालचं पोरीच्या नशिबी.

 * पोरींना बिचाऱ्यांना आपलं भाग्य लगेच समजतं. त्यांचे भाऊ बाहेर हुंदडायला गेले तरी त्या निमूटपणे आईच्या मदतीला लागतात. आई आजारी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४२