पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आग्रह धरणाऱ्या मार्क्सवादाने आपल्या दृष्टिकोनातून स्त्रियांच्या प्रश्नाचा इतिहास मांडला. सैद्धांतिक आणि व्यावहारिक पातळीवर मार्क्सवादाची स्त्री-प्रश्नाची उकल आज कोलमडली आहे. काही काळात कामगार चळवळीला स्त्री- कार्यकर्त्यांचा लाभलेला सहभाग एवढीच त्याची फलश्रुती राहिली. दुसऱ्या महायुद्धानंतर उभ्या राहिलेल्या स्त्री-वादी चळवळीला या प्रश्नाच्या हाताळणीबद्दल स्पष्ट असमाधान होते. या नवीन स्त्री-कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा, झेप दांडगी पण जागरणाचा आवाका कुठे खोलवर पोहोचताना दिसत नाही. त्यात मार्क्सवादी लगबगीने सामील होऊन, मार्क्सवादी सिद्धांताचे अर्धे-मुर्धे समर्थन करून स्त्री-आंदोलनाच्या ताकदीचा प्रभाव आपल्या ताटात पुन्हा ओढून घेण्याची घाई करत आहेत. पण या प्रश्नाविषयी अडाण्यातल्या अडाण्यापासून सुशिक्षित सुसंपन्न स्त्रीपर्यंतच्या स्त्रीच्या मनातील सार्वत्रिक असंतोषाला तोंड फोडण्याची ताकद उभी राहताना दिसत नाही.
 याउलट, संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांच्या साध्या साध्या सभांना हजारोंनी स्त्री-पुरुष जमतात. अगदी छपरांवर गर्दी करून बसतात आणि ऐकतात. कालपर्यंत चार भिंतींच्या आत तोंड उघडायला घाबरणाऱ्या बायाबापड्या लाउडस्पीकरसमोर येऊन जिभेवर साक्षात सरस्वती प्रकटली असावी तसे बोलतात. पंडितांनी दिलेला विचार स्त्री-मुक्तीला अपुरा पडला. आता शेतकरी स्त्री स्वत:च आपला झेंडा आणि विचार घेऊन पुढे येत आहे. संघटनेच्या विचाराने ही दबलेली वाफ बाहेर पडायला मार्ग झाला हे संघटनेचे भाग्य. संघटनेच्या विचाराचा महिलाप्रश्नाशी संबंध महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलांनी जोडून दाखविला. सामुदायिक विचारमंथनाचा एक अपूर्व प्रयोग गमभन सुद्धा न शिकलेल्या, महाराष्ट्रातील शेतकरी स्त्रियांनी करून दाखविला. म्हाताऱ्या- कोताऱ्यांपासून चिरडीतल्या पोरींपर्यंत, काही शिकलेल्या, काहींच्या घरी पाटी- पेन्सिल अजून आलेली नाही; काही बऱ्या घरच्या, जरा तुकतुकीत शरीराच्या, तर काहींचं पोट हातावर आणि हातापायांवर भेगा पण या सामुदायिक विचारमंथनात सहभाग सगळ्यांचा. संघटनेचा महिलाप्रश्नावरचा विचार आणि 'चांदवडचा जाहीरनामा' याच्या खऱ्या लेखिका या शेकडो शेतकरी आया- बहिणी आहेत.


 २. स्त्रियांची अवस्था


 स्त्री आर्थिकदृष्ट्या परावलंबी आहे, चूल आणि मूल याला बांधली आहे,

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४१