पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/42

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "शेतमालाच्या रास्त भावाचा फायदा शेतमजुराला मिळतो याबद्दल आमची खात्री आहे पण त्याचा फायदा शेतकऱ्याच्या घरच्या मायबहिणींना मिळेल याबद्दल जबरदस्त शंका आहे. कालचा साधा शेतकरी आज सोसायटीचा चेअरमन, कारखान्याचा चेअरमन झाला, मुंबई-दिल्लीला गाडी-विमानाने फेऱ्या घालू लागला तरी त्याच्या बायकोची डोईवरची भाकरीची टोपली नशिबी कायम ती कायम."
 आणि समजा, रास्त भावाचा फायदा शेतकऱ्याच्या कारभारणीपर्यंत पोहोचला तरी केवळ तेवढ्यानेच तिचे स्त्री म्हणून सगळे प्रश्न सुटतात काय?
 स्त्रियांतही 'इंडिया', 'भारत' ?
 मग एककलमी कार्यक्रमाच्या पलीकडे शेतकरी स्त्रियांसाठी संघटनेचा कार्यक्रम कोणता? का शेतकरी संघटना एकूण शेतकरी समाजाच्या फक्त निम्म्या भागाची म्हणजे पुरुष शेतकऱ्यांचीच संघटना होणार?
 शेतकरी संघटनेने भारत-इंडिया ही संदर्भरेषा मांडली. "भारत" – "इंडिया" म्हणजे खेडे-शहर नाही. संघटनेने खेड्यातील पुढारी शेतकरी आणि त्यांची गोतावळ हे इंडियाचे भारतातील 'रावसाहेब', 'रावबहादूर' म्हणून मानले; शहरातले झोपडपट्टीतील, फूटपाथवरील शोषित ही भारतातून इंडियात आलेली निर्वासित मंडळी म्हटले. शहरातील स्त्रियांची अवस्था काय आहे ? त्याही गुलामगिरीत नाहीत काय? त्यांचेही शोषण होत असेल तर मग त्यांना इंडियात धरायचे का भारतात? भारतातील शेतकरी स्त्रीची इंडियातील पांढरपेशी गुलाम स्त्री "सखी" का "शत्रू" ?
 मूलगामी विचाराची आवश्यकता
 स्त्रियांच्या हलाखीची सुरुवात मनुष्यजातीच्या इतिहासापासून म्हणजे अनादि कालापासून झाली नसेल तर ती झाली तरी केव्हापासून ? आजपर्यंतचा इतिहास हा शेतीच्या शोषणाच्या साधनांतील उत्क्रांतीचा इतिहास आहे. दरोडेखोरांची लुटालूट, लुटारूंनी तयार केलेली राजसत्ता, महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था, सावकारी, जमीनदारी, वसाहतवाद - पहिल्यांदा गोरा आणि मग काळा अशा टप्प्यांनी मनुष्यजातीच्या इतिहासाचा आलेख संघटनेने मांडला. यातील कोणत्या टप्प्यात स्त्रीच्या पायात साखळ्या पडल्या आणि तिच्या दुर्दैवाचे फेरे चालू झाले, असे का घडले, कसे घडले याची उत्तरे देण्याची जबाबदारी संघटनेवर आहे.

 शेतकरी संघटना हा एक विचार आहे, एवढेच नव्हे तर ती एक नवी विचारपद्धती आहे असा आग्रह संघटनेने वारंवार धरला आहे. यापूर्वी असा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ४०