पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 * त्या कोवळ्या वयातही आईनं सांगितलं नाही तरी तिला मदत करायची जरूर असल्याची जाणीव पोरींना कशी होते कोणास ठाऊक?
 * पाच, सहा वर्षांची झाली - ज्या वयात शहरातली मुलं थंडीच्या दिवसात ऊबदार पांघरुणात उशिरापर्यंत शांतपणे झोपून राहतात आणि त्यांना झोपलेले पाहून त्यांचे आई-बाप जोडीने उभे राहून कौतुक करतात त्या वयात ही शेतकऱ्याची पोर आईनं नाहीतर बापानं गोधडीतून उचकटून टाकल्यामुळे डोळे चोळीत चोळीत शेण गोळा करायला धावते.
 * दिवसभर गुरांच्या मागे धाव धाव धावून संध्याकाळी अंग धुळीने भरलेले, केस धुळीने माखलेले आणि हातापायावर काट्याफांद्यांचे ओरखडे अशी पोटाशी पाय घेऊन झोपी पडते.
 * चौदापंधरा वर्षांची व्हायच्या आत लग्न, सासर. लग्नाच्या दिवशी अंगावर फुलं चढतील तीच. त्यानंतर चढायची ती सरणावर चढतानाच. सासरी सगळं गोड असलं तरी कधी हौस नाही, मौज नाही. बाजारात गेली तर दुकानात एखाद्या कपाटांत बरी कापडं दिसली तर तिथं नजर टिकवायची नाही - उगच मनात कधी पुरी होऊ न शकणारी इच्छा उभी राहील या भीतीनं. पण आई म्हणून लहानग्याला अंगडं, टोपडं चढवावं, तीट लावावी, काजळ घालावं, बाळाचं आपण कौतुक करावं, इतरांनी कौतुक करावं, त्याच्या बापानंही करावं एवढी साधी इच्छासुद्धा कधी पुरी व्हायची नाही.
 * आणि जर का सासरचं दूध फाटलं व भावाकडे येऊन तुकडे मोडायला लागले तर मग सगळा आनंदच.
 इत्यादी...
 एककलमी कार्यक्रम
 पण, या अवस्थेत शेतकरी बाई पडलीच कशी? 'उत्तम व्यवहार, शेतीतली लक्ष्मी अशी पायतळी आली कशी? ती या नरकातून सुटणार कशी?

 देशातल्या गरिबीच्या समस्येवर संघटनेने "शेतीमालाला रास्त भाव" हा एककलमी कार्यक्रम सांगितला. देशातील गरिबी एकूण मुळात शेतीतली गरिबी आणि शेतीच्या गरिबीचे कारण शेती तोट्यात राहावी याचे पराकाष्ठेचे नियोजन. 'शेती तोट्यात राहावी म्हणून जे भगीरथ प्रयत्न चालतात ते बंद केले तर गरिबी आपोआप हटेल कारण गरिबी ही विकृती आहे, गरिबी नाहीशी होणे ही निसर्गसिद्ध गोष्ट आहे' असे संघटनेने मांडले. मग शेतकरी बाईची विपन्नावस्था ही विकृती का निसर्गसिद्ध रचना? या एककलमी कार्यक्रमात स्त्रियांच्या प्रश्नाचीही सोडवणूक आहे का?

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ३९