पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुलं पोलीस गोळीबारात ठार झाली. तिचं सांत्वन करायला जाणाऱ्यांना ती खंबीरपणे उत्तर देई, "संघटनेने आदेश दिला तर मी तिसऱ्या मुलालाही सत्याग्रहाला पाठवायला तयार आहे." स्त्रियांच्या धैर्याच्या अशा अनेक हकीकती आंदोलनात घडल्या.
 अगदी नेहमीच्या दिवसांतसुद्धा एक नवा चमत्कार डोळ्यांसमोर उलगडत होता. एरवीचं चित्र म्हणजे गावातल्या सभांना राजकीय पक्षांचे पुढारी आले की माय-बहिणी दारं बंद करून घरातच थांबायच्या. कुतुहलाने काही काळ कानावर येऊन आदळणारी भाषणे ऐकायच्या. पण त्यात काहीच अर्थ नाही हे लवकरच लक्षात आलं की कानझाक करून आपापल्या कामाला लागायच्या. संघटनेने काय नवी फुंकर घातली! गावागावात निःशंकपणे, निर्भयपणे महिला सभेला येऊन बसू लागल्या. पहिल्यांदा सभेपासून थोडं लांब उभं राहून किंवा बसून ऐकायच्या. नंतर हळूहळू हक्काने पुढे येऊन बरोबरीने बसू लागल्या, भाषणं ऐकू लागल्या. जे कानावर पडतं आहे ते झटकून टाकण्यासारखं नाही, त्यात नाटक नाही, आवेश नाही पण जो अर्थ आहे तो आपल्या गाडग्या- मडक्यात उरलेल्या दाण्यांपर्यंत पोहोचणारा आहे याची साक्ष त्यांना कुठेतरी पटत असावी.
 स्त्रीच्या प्रश्नाची तोंडओळख
 खरं म्हणजे शेतकारी संघटनेने शेतकरी स्त्रियांकरिता असा काहीच वेगळा कार्यक्रम ठेवला नव्हता. ३ जानेवारी १९८२ ला सटाण्याच्या अधिवेशनामध्ये शेतकरी स्त्रियांच्या प्रश्नाची चर्चा वेगळी ठेवली होती. त्या वेळी आंदोलनातील शेतकरी महिलांच्या सहभागाची गरज, त्यांच्यामध्ये या प्रश्नाची जाणीव तयार करायची आवश्यकता म्हणजे थोडक्यात, शेतकरी आंदोलनाची ताकद वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना मायबहिणींनीही हातभार लावायचा यापलीकडे, निदान पुरुष कार्यकर्त्यांच्या मनाततरी, फारशी स्पष्ट जाणीव नसावी. अधिवेशनात त्या स्त्रियांचा उत्साहही 'शेतकरी' या भूमिकेतून होता. स्त्रियांच्या प्रश्नावर यातून काही तोड निघेल असे त्यांनाही वाटले नसावे.
 शेतकऱ्यांतील स्त्रियांचे म्हणून काही वेगळे प्रश्न आहेत काय? ते प्रश्न कसे तयार झाले ? त्या प्रश्नांची सुटका काय? संघटनेतील सभांच्या भाषणांत उल्लेख येत...

 * शेतकऱ्याच्या घरी मुलगी म्हणून जन्माला येण्यासारखं पाप नाही. पायावर उभी राहायला लागते ना लागते तो एखादं धाकटं भावंड सांभाळायची जबाबदारी.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ३८