पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/39

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न



 १. शेतकरी स्त्रीचा आंदोलनातील सहभाग

 १९८० साली शेतकऱ्यांच्या नव्या आंदोलनाला सुरुवात झाली, त्यानंतर सहा वर्षांनी शेतकरी स्त्रियांची सशक्त आघाडी उभी राहिली. अगदी १७६३ पासूनच्या सर्व शेतकरी आंदोलनांत स्त्रियांचा सहभाग होता आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीतही स्त्रियांनी उत्साहाने भाग घेतला होता. पण या नव्या आंदोलनात ग्रामीण भागातील स्त्री अर्थवादी चळवळीसाठी पहिल्यांदाच घराबाहेर आली. यापूर्वी, एक भक्तिमार्गाचा अपवाद सोडला तर, एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी स्त्री घराबाहेर पडलेली नव्हती. १९८० सालच्या शेतकरी आंदोलनात चाकण, खेरवाडी, कसबेसुकेणे, चांदवड, साक्री, देरडे अशा अनेक ठिकाणी पोलिसांनी स्त्रियांना तुरुंगात न नेता सोडून देण्याची तयारी दाखविली. पण स्त्री-सत्याग्रहींनी आपल्याला तुरुंगात जायचेच आहे असा आग्रह धरला. साक्री तालुक्यातील स्त्रियांवर लाठीहल्लाही झाला. निपाणीच्या तंबाखू आंदोलनात पाच ते सात हजार शेतकरी, विडीकामगार, तंबाखू कामगार स्त्रिया हजर होत्या. दिवसभर कारखानावखारीतले काम सांभाळूनसुद्धा कामगारस्त्रियांनी सत्याग्रहाच्या ठिकाणी २३ दिवस हजेरी लावली. २० जुलै १९८४ रोजी महाराष्ट्रातील शेतकरी सत्याग्रहींना चंदीगढ येथे अटक झाली तेव्हा विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या सुटकेसाठी जी निदर्शने झाली ती प्रामुख्याने स्त्रियांच्या सहभागानेच झाली.

 निपाणीच्या गोळीबारानंतर सत्याग्रहातील शेकडो स्त्रीसत्याग्रहींना फक्त नेसत्या वस्त्रांवर शेकडो मैल दूरच्या बल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगांत पंधरा पंधरा दिवस नेऊन टाकले. तक्रार तर केली नाहीच उलट "माहेरीसुद्धा आम्हाला एवढा आराम भेटत नाही" असं कौतुक सांगितलं. एका म्हाताऱ्या बाईची दोन

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / ३७