पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कायम राहिली. सरकारने रोजगार द्यावा, घर द्यावे, अडीअडचणीच्या काळी सरकारनेच मदत करावी अशी मोठी भयभीत मानसिकता दृढ झाली. सरकार सर्व क्षेत्रांत मूलत:च नालायक असते. अशा सरकारला कोणत्याही क्षेत्रात काय म्हणून अधिकार द्यावा याचे काही उत्तर नव्हते. पण, निदान शिक्षण, आरोग्य आणि अन्नधान्याचा पुरवठा या बाबतीततरी सरकारची निगराणीच नव्हे तर हस्तक्षेपही आवश्यक आहे असे बहुजनांचे मत झाले. हा विचार काही आर्थिक नव्हता. हे एक सामाजिक तत्त्वज्ञान होते. पण, डॉ. अमर्त्य सेन या भारतीय विद्वानाने शिक्षण, आरोग्य आणि दुष्काळनिवारण यासाठी व्यापक आणि कार्यक्षम सरकारी यंत्रणा आवश्यक आहे असा सिद्धांत मांडला आणि त्याबद्दल त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिकही मिळाले. डॉ. अमर्त्य सेन यांची कामगिरी पाहता त्यांना नोबेल पारितोषिक मिळावे यात फारसे काही अनुचित झाले असे कोणी म्हणणार नाही. पण, त्यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक का देण्यात आले हे मोठे आश्चर्य आहे.
 सरकार या संस्थेचीच सर्वत्र छी: थू झाली असताना, शासनसंस्था कर्जात बुडत असताना आणि देशातील प्राथमिक सुरक्षा व कायदा आणि सुव्यवस्था राखणे सरकारला अशक्य झाले असताना मरू घातलेल्या समाजवादाला आणि शासनसंस्थेला डॉक्टरसाहेबांच्या सिद्धांताने ऑक्सिजन मिळाला. शिक्षण, पोषण, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रांत सरकारच्या हस्तक्षेपाचा मोठा बडेजाव होऊ लागला. जुने समाजवादी मोठ्या प्रमाणत या चार क्षेत्रांत घुसले आणि आपापल्या स्वयंसेवी संघटना काढून ते चांगल्यापैकी चरितार्थ करू लागले. ज्या स्वयंसेवी संघटनांना जनाधार नाही, समस्यांची समज नाही त्यांनी सरकारी खजिना लुटायला सुरुवात केली आणि सरकारी कागदोपत्रीही सरकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि नियोजन यांत स्वयंसेवी संघटनाची फार महत्त्वाची भूमिका असल्याचे आवर्जून नोंदविले जाऊ लागले.

 १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. १९४७ च्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी सर्वदूर पावसाने रिपरिप लावली होती, देशाच्या विभाजनाचे दुःख होते, निर्वासितांचा आक्रोश होता पण, तरीही जागोजागी लाखालाखांच्या संख्येने जनसमुदाय जमा होत होता, आनंदाने बेहोश होऊन 'जय हिंद'च्या घोषणा देत होता. १९९७ सालचे चित्र अगदी वेगळे होते. स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांत स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे स्वप्न साकार होण्याचे दूरच, प्रत्यक्षात 'हे काड्यामोड्याचे पुढारी देश लुटून खातील' ही चर्चिलची शापवाणीच खरी ठरली याची जनसामान्यांना जाणीव

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / २४