पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्हताच अशी टोपी फिरविण्यापासून ते कम्युनिझमला स्टॅलिनवादाचे स्वरूप आले, हुकूमशाही बोकाळली, शेतीकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही अशा काबुलीजबाबापर्यंत हातचलाख्या करून दाखविल्या. समाजवादी रशियाचे पतन हे समाजवादी सिद्धांतांच्या दोषांमुळे होते, हे दोष लेनिन व स्टॅलिन यांच्या स्वभावांतील विकृतींमुळे आलेले नव्हते, त्यांचे मूळ खुद्द मार्क्सवादातच होते हे, खरे म्हटले तर, उघड झाले होते. समाजवादी रशियाची अर्थव्यवस्था ढासळली त्यातून एवढेच सिद्ध झाले की सामूहिक निर्णय कधीही समूहाच्या हिताचे असत नाहीत. समूहाच्या नावाखाली एखादी व्यक्ती किंवा गट आपल्या स्वार्थाचे तत्त्वज्ञान बनवून ते समाजावर लादतो. ॲरो (Arrow)च्या सिद्धांतानुसार, सामूहिक निर्णय हे अशास्त्रीयच असणार हे सिद्ध झाले.
 भारतात समाजवादाच्या पतनासंबंधी शास्त्रशुद्ध चर्चा झाली असती तर नेहरूवादाचे जोखड भिरकावून देऊन सरळसरळ सर्व उद्योजकांच्या प्रतिभेला आणि धाडसाला वाव देणारी व्यवस्था तयार झाली असती. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा, वेगवेगळ्या ऐतिहासिक कारणांमुळे, जनमानसावर मोठा प्रभाव राहिला. समाजवादातील वाह्यातपणा सर्वांच्या लक्षात आला; पण नेहरू चुकले आणि इंदिरा गांधी फसल्या हे कबूल करायला जनमानस धजेना.

 ज्या ज्या देशात समाजवाद वीसपंचवीस वर्षेतरी नांदला त्या त्या देशात एक मोठी विचित्र परिस्थिती आढळून येते. उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल, श्रमशक्ती, तयार करायच्या मालाचा आराखडा आणि भांडवल एकत्र आणावे आणि सामाजिक उत्पादन वाढवून चरितार्थ चालवावा हा अर्थाचा पुरुषार्थ तेथे लुप्त होतो. सरकारने काय ते सारे निर्णय घ्यावे, सामान्य नागरिकांनी ठरलेल्या वेळात ठरावीक जागी जाऊन सांगितलेली कामे करावीत, त्याबद्दल जो काही मेहेनताना मिळेल तो, वर्तमान नेत्याचा जयजयकार करीत, स्वीकारावा अशी एक 'चाकरमानी' मानसिकता तयार होते. पूर्व युरोपातील समाजवादी अर्थव्यवस्था ढासळली त्यानंतर तेथील चांगल्या शिकल्यासवरल्या लोकांना, भारतासारख्या मागासलेल्या देशातील धारावीसारख्या झोपडपट्टीतही खासगी उद्योगधंदे लोक चालवतात याचे मोठे अद्भुत वाटे. १९९१ मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारांचा झेंडा उभारला पण, समाजवादाच्या काळात उभी केलेली सारी संस्थाने कायम ठेवली. नियोजन मंडळ तसेच राहिले, अन्नमहामंडळ तसेच राहिले, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला हात लागला नाही आणि त्यामुळे देशाने आर्थिक क्षेत्रातील दिशा बदलली आहे हे सर्वसामान्य जनांना समजलेही नाही. चार दशके जोपासलेली 'मायबाप सरकार सर्व काही करील' ही मानसिकता

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / २३