पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तोंड पाहण्याची' इच्छा होती, तर कोणाला 'अहेवपणी मरणाची'. पण, अजूनही कोणी आपल्या मनातलं बोलत नव्हत्या, आपल्याला काय हवे, नको ते बोलत नव्हत्या असे जाणवत होते. मग, मला एकदम

  'सत्वर पाव गे मला, भवानी आई, रोडगा वाहीन तुला,
 सासू माझी गावी गेली, तिथंच खपू दे तिला'

 या भारुडाची आठवण झाली. असल्या मनीच्या इच्छा बोलून दाखविण्याची कोणाची तयारी नव्हती. मग, मी आणखी एक प्रश्न धाडसाने विचारला. 'जन्मल्यापासून आतापर्यंत, बाईच्या जन्माला आले याचा कधी आनंद झाला का?'
 उत्तर लगेच मिळाले, 'पहिला मुलगा झाला तवा लई आनंद झाला' आणि अचानक, एका साध्यासुध्या दिसणाऱ्या बाईने एक ओळ म्हणून दाखविली,

  'अस्तुरी जल्मा नको घालू शिरीहारी,
 रात न दिस परायाची ताबेदारी '

 शेतकरी संघटनेच्या नैतिक दर्शनातील 'स्वातंत्र्याच्या कक्षा (Degrees of Freedom)' ही कल्पना इतकी सहज पुढे आल्यामुळे मी आनंदून गेलो. विजय परूळकरांनी एका कागदाच्या तुकड्यावर एक चिठ्ठी पाठविली, 'मी स्वत:ला संचारतज्ज्ञ समजतो, पण तुमच्यापुढे माझे साष्टांग दंडवत आहे.'
 बायांची राहण्याची सोय जवळच्याच घरी होती. त्या दिवशी बाया घरी गेल्या. रात्री बहुधा त्यांनी अहमहमिकेने भजने म्हटली असावीत. दुसरे दिवशी नाश्ता करून त्या बैठकीला आल्या आणि मग, कुपोषणाची सर्व लक्षणे दिसणाऱ्या, एका बाईने मला म्हटले, 'भाऊ, तुम्ही कालपासून आम्हाला बोलायला सांगता. कोणाची हिम्मत होत नाही. पण, मी ठरवले आहे. पूर्वी माहेर असताना तेथे गेल्यावर सगळं काही - हातचं राखून न ठेवता सगळं- भावाला सांगायची. आता तुम्हीच माझे भाऊ; तुमच्यापासून काय लपवून ठेवायचं? मी तर सगळं काही सांगणार आहे.'
 मग तिने तिची कहाणी सांगितली : 'उसाला भाव मिळाला, मालक दारू पिऊ लागले आणि मला फक्त मार पडायला लागला.' पुढे मी ही कहाणी अनेक वेळा सांगितली आहे. पण, त्या क्षणी शेतकरी महिला आघाडीच्या बाया आणि मी यांच्यात – पत्रकार सतीश कामत यांच्या शब्दांत - मालकाच्या 'साहेबां'ना 'भाऊ' म्हणणारे नाते तयार झाले.

 नंतर एकेकीने आपले प्रश्न मांडले - भाषणासारखे नाही, बोलल्यासारखे. विधवापणामुळे किंवा संसार नासल्यामुळे माहेरी माघारी येऊन मोठ्या भावाकडे,

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १९