पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नजरेमध्ये.
 पहिल्यांदा मी बोलायला सुरुवात केली. 'शेतकरी संघटना आता बायांचा प्रश्न समजावून घेत आहे. तुमचे अनुभव, तुमची सुखदुःखे तुम्ही बोलून दाखविली तर संघटनेला ती समजू शकतील. घाबरू नका, तुम्ही काय बोलता ते तुमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनाच काय पण, तुमच्या मालकांनासुद्धा कळणार नाही. इ. इ.'
 सगळ्या बायका मुखस्तंभ. मग, सरोजावहिनी परूळकरांनी त्यांना समजावून सांगितले. 'बरं का?', 'किनई?' अशा स्त्रीसुलभ शब्दांची पेरणी करीत जवळीक साधायचा प्रयत्न केला. पण, बायांच्या तोंडून हू नाही की चू नाही.
 विजय परूळकर संयुक्त राष्ट्रसंघातील संचार विषयाचे विशेषज्ञ. ते नुसतेच गालातल्या गालात हसत पाहत होते. पुढे काहीच होत नाही म्हटल्यावर आम्ही जेवणाची सुटी घेतली. त्यानंतरच्या बैठकीत, बहुधा पोट भरल्यानंतर, बायका आश्वस्त दिसत होत्या. पुन्हा प्रश्नांची सरबत्ती करण्याचे धाडस मला झाले नाही. मग, मी माझा आवडता

  'जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा
 देवा सांगू सुखदु:ख, देव निवारील भूक'

 हा अभंग शक्य तितक्या सुरात म्हटला आणि त्यांना भजने, जात्यावरची गाणी जे काही म्हणता येत असेल ते म्हणायला सांगितले. सुरुवातीला कोणी गायलाही तयार होईना. मग, हळूहळू दोनचारजणी मिळून गायल्या. मग, एकटीदुकटी गाऊ लागली. मग, शेवटी 'तू थांब, आता मी म्हणते' अशी चढाओढही झाली. एकदा मनातील धास्ती गेल्यानंतर आवाजही खुले आणि सुरेल होऊ लागले. सगळ्यांच्या आवाजात, जात्यावर गात असताना बायांच्या आवाजात जो दुःखाचा टाहो असतो तो स्पष्ट जाणवत होता. भजनागाण्यांचा उत्साह ओसरल्यावर मी सहज म्हटल्यासारखे म्हटले, 'तुम्ही भजनं इतकी आर्जवून म्हटली की देव खरेच प्रसन्न होईल. पण समजा, देव आता तुमच्या पुढे उभा राहिला आणि वर मागा, एकच वर मागा म्हणाला तर तुम्ही काय मागाल?' पण, या प्रश्नालाही फारसे उत्साहाने उत्तर आले नाही. आपले उत्तर कोणाला पटेल, कोणाला आवडणार नाही असला धोका घेण्यापेक्षा अगदी बिनाधोक्याचे उत्तर द्यावे म्हणून एक मध्यमवयीन बाई म्हणाली, 'मी म्हणेन, घेवा, माजं कुक्कू तेवडं शाबूत ठेवा!' तेवढ्याने बायांची भीड चेपली आणि त्या बोलू लागल्या. कोणी म्हणाली, 'माजं पोरगं तेवडं मास्तर होऊ द्या', कोणी म्हणाली, 'माज्या पोरीचं हात पिवळं होऊ द्या', कोणाला 'नातवाचं

चांदवडची शिदोरी: स्त्रियांचा प्रश्न / १८