पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि नेहरूंसारखे गुलजार राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडलेलेही आले.
 शेतकरी संघटनेने कुटुंबसंस्था आणि राज्यसंस्था यांचा उगम आणि अस्त मांडला होता. हा सिद्धांत एंगल्स्च्या सिद्धांतापेक्षा अधिक बरोबर का कमी याचा निर्णय इतिहासच करील. हा सिद्धांत आधुनिक महिला चळवळीने मांडलेल्या 'टोळीतील सुदृढ संततीसाठी परकीय टोळ्यांतील स्त्रियांच्या अपहरणाच्या' सिद्धांतापेक्षा कितीतरी पटीने तर्कशुद्ध होता. शेतकरी महिला आघाडीची महिला प्रश्नाची सैद्धांतिक मांडणी शेतकरी संघटनेच्या समाजविकासाच्या सिद्धांताशी सुसंगत असणेही आवश्यक आणि अपरिहार्यही होते.
 महाकवी कालिदासाने रघुवंशातील एक एक उज्ज्वल चरित्राचे वर्णन लिहिण्याआधी-

क्व सूर्य प्रभवो वंश: क्व चाल्प विषया मतिः

 असा संदेह मांडला. स्त्रियांच्या प्रश्नाची मांडणी करायला सुरुवात करताना, वर्णन करावयाचा विषय केवढा मोठा आणि माझ्या हातून त्याचे मंथन व्हायचे कसे अशी चिंता मलाही पडली. मग, एकदम 'युरेका' झाले. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हा प्रयोग मी शेतकऱ्यांच्या बाबतीत केला. शेतकरी महिलेचा प्रश्न समजून घेण्यासाठी, तसे दुय्यम प्रतीचे पण सर्वोत्तम उपलब्ध साधन म्हणजे स्त्रियांनाच बोलते करणे एवढेच होते. आम्ही कामाला लागलो. आम्ही म्हणजे मी, 'योद्धा शेतकरी'चे लेखक विजय परूळकर आणि त्यांच्या पत्नी सरोजा परूळकर. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी स्त्रियांच्या बैठका घेतल्या. १९८० सालापासून ते १९८५ सालापर्यंत शेतकरी वर्गाचे अलोट प्रेम मला लाभले होते. शेतकरी स्त्रियाही तोपावेतो, दरवाजाच्या फळीआड राहून संघटनेच्या सभा ऐकण्याचे सोडून सभेच्या अवतीभोवती बसू लागल्या होत्या. त्यामुळे, बैठकांचे आयोजन करणे कठीण नव्हते ; खरे कठीण काम होते बायांना बोलते करण्याचे.

 चांदवडच्या अधिवेशनाच्या तयारीसाठी पहिली बैठक झाली ती हळी हंडरगुळी या मराठवाड्यातील गावी. एका तात्पुरत्या उभारलेल्या मांडवात सतरंजीवर पंधरावीस बाया जमलेल्या. शाळेची आणि अक्षरांची जेमतेम ओळख. सगळ्या शेतीवर राबणाऱ्या. उन्हाने काळ्या पडलेल्या. पायांना भेगाच भेगा. पण तरीही, त्यांच्या डोळ्यांत एकाच वेळी कुतूहल आणि भीती होती. आपल्या मालकांनी त्यांच्या साहेबांच्या बैठकीला आपल्याला बसायला सांगितले, हे कसे? खुद्द मालकांनाच कधी शरद जोशींबरोबर असे बैठकीला बसायला मिळालेले नाही. आता आपल्याला काय विचारतात आणि कसे बोलायचे याचा धाक सगळ्यांच्या

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १७