पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्या. धान्याचा साठा कधी संपत म्हणून नाही अशी बायबलच्या जुन्या करारातील ईडन गार्डन (Eden Garden) सारखी स्वर्गसदृश परिस्थिती तयार झाली.
 अन्नाचा प्रश्न तर सुटला पण इतर गरजा काही थोड्या नव्हत्या. उन्हापावसाला थोपवील अशा निवाऱ्याची गरज होती. अंगावर पांघरायला वस्त्रांची गरज होती. पायी चालण्यापेक्षा नव्याने शोध लागलेल्या चाकाचा उपयोग करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी कष्टांनी कसे जाता येईल याचीही शक्यता दिसू लागली होती. टोळीतील सगळ्या माणसांनी आता शेतीत काम करण्याची आवश्यकता नाही तेव्हा काही माणसांनी शेतीचे काम सोडून लाकूडतोड, निवारा, वस्त्रवल्कले अशा कामांकडे वळावे अशी सहजप्रवृत्ती होऊ लागली. ही स्वप्ने साकारली असती तर शेतीतून तयार होणाऱ्या अमाप वरकड उत्पन्नातून सतत टिकाऊ आणि गणितश्रेणीने वाढणाऱ्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली असती.
 वरकड उत्पादनाची लूट
 पण, असे व्हायचे नव्हते. बैल जोडून नांगरट करून शेती पिकविणाऱ्या लोकांच्या खटाटोपाकडे काही माणसे कुचेष्टेने पाहत होती. अन्न पिकविणारे राबराबून अन्न पिकवितात, त्यांच्याशी दांडगाई करून त्यांनी पिकविलेले अन्न लुटून नेणे हे तुलनेने कितीतरी अधिक सोपे. त्यामुळे, भुरट्या चोरीपासून ते सशस्त्र दरोड्यांपर्यंत लुटारूंनी झपाट्याने प्रगती केली. अन्न पिकविणाऱ्यांच्या हाती बैल लागला आणि लुटारूंच्या हाती घोडा! मगतर लुटारूंची चंगळच झाली. दूरवरच्या प्रदेशांत जाऊन लूट करता येऊ लागली. मोठ्या टोळ्यांचे नायक सरदार बनले, राजे बनले, सम्राट बनले. त्यांतील काहीनी लुटीसाठी काही तत्त्वज्ञाने बनविली. लुटी केल्याने पापतर लागत नाहीच, उलट परमेश्वराची मेहेरनजर होते अशी दर्शनेही तयार झाली. बैलांची शेती सुरू झाल्यापासून मनुष्यजातीचा सारा इतिहास हा शेतीत तयार होणाऱ्या वरकड उत्पादनाच्या लुटीच्या साधनांचा इतिहास आहे. कधी लूट तलवारीने झाली, कधी धनुष्यबाणाने, कधी बंदुकीने तर कधी तोफांनी. आपल्या अमलाखाली आलेल्या शेतकऱ्यांवर शेतसारा घातला गेला. स्थानिक राजाला सारा वसुलीची मक्तेदारी मिळाली आणि त्याबदल्यात परक्या आक्रमणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारीही. राजे उभे राहिले आणि सम्राटही.

 साम्राज्यशाहीच्या कालखंडात या लुटीचे स्वरूप बदलले. जुजबी रक्तपात करून वरकड उत्पादन दीड दांडीच्या तराजूच्या चमत्काराने लांबविण्याचे मार्ग निघाले. त्यांत इंग्रजांसारखे साम्राज्यवादी आले, स्टॅलीनसारखे समाजवादी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १६