पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या कालखंडांची तुलना करण्यासाठी चार घटकांचा विचार करता येईल : राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानसंबंधी. स्थूलमानाने या कालखंडाचे विवरण पुढीलप्रमाणे असेल.
  मुसलमानपूर्व समाजात स्वकीय सवर्णांचे राज्य असले तरी अर्थव्यवस्था शोषणाची असल्यामुळे आणि एकूण जगच बंदिस्त असल्याने स्त्रियांचा मानसन्मान व्यवहारापेक्षा पुस्तकातील वचनांत अधिक होता. काही विदुषी, वेदवादिनी, संन्यासिनी इत्यादींचे अपवाद सोडल्यास स्त्रीला स्वातंत्र्य आणि मोक्ष, दोन्ही उपलब्ध नव्हते. पुरुषांच्या स्वर्ग आणि मोक्ष यांच्या मार्गातील ती धोंडच मानली जाई. स्वयंवर यांबाबत मात्र तिला व्यापक स्वातंत्र्य असावे असे मानण्यास आधार आहे.
  मुसलमानी अमलात परकीय शोषकांचे असुरक्षित राज्य प्रस्थापित झाल्याने स्त्रियांची पीछेहाट झाली, त्या घरात कोंडल्या गेल्या, गोशापद्धती मोठ्या खानदानांतही स्वीकारली गेली.
  पेशवाईच्या काळात राज्य स्वकीयांचे आले, पण असुरक्षितता वाढली. शोषण चालूच राहिले. मुलूखगिरीचे वार्षिक पंचांग सुरू झाले. त्यामुळे कलावंत समाज व त्यांतील स्त्रिया यांच्या स्वातंत्र्यात फरक पडला. एरवी गरती स्त्रियांची अवस्था अधिकच बिघडली. बालविवाह, सती, केशवपन यांचे प्रमाण वाढले. जिजाबाई, ताराबाई, येसूबाई, आनंदीबाई, अहल्याबाई अशा काही, राजघराण्यांतील स्त्रियांची सामाजिक-राजकीय प्रतिष्ठा होती.
  इंग्रजांचे राज्य पुन्हा परकीयांचे राज्य. त्यांच्या राज्यात शोषणाचे प्रमाण वाढले. पण त्याची पद्धती लुटालुटीची राहिली नाही. तंत्रज्ञान विस्तारले; रस्ते, आगगाड्या, तारयंत्रे, टपाल, वर्तमानपत्रे, पुस्तके यांचा प्रसार झाला. स्त्रिया शिकू लागल्या, वाचू लागल्या, लिहू लागल्या. पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या स्त्रिया सामाजिक प्रश्नांवरही हिमतीने भूमिका घेऊ लागल्या. सतीबंदी, संमतिवय यासंबंधी कायदे झाले. कायद्याचे संरक्षण सासरघरच्या सुनांनाही मिळू लागले. स्वातंत्र्याच्या चळवळीतही, विशेषतः गांधीकाळात स्त्रिया मोठ्या प्रमाणावर उतरल्या. स्त्रियांच्या दृष्टीने हा मोठा मुक्तीचा कालखंड मानावा लागेल.
  स्वातंत्र्यानंतर स्वकीय सवर्णांचे शोषक राज्य आले. पण समाजवादी व्यवस्थेच्या बडेजावाने समाज अधिक बंदिस्त बनला.

 परदेशी तंत्रज्ञानामुळे अन्नधान्य मुबलक झाले, बाळंतपण अधिक सुरक्षित झाले, लहान बाळांच्या मृत्यूचे प्रमाण घटले, घरकामात थोडी सुकरता आली;

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५९