पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रिया घरकामात अधिक कोंडल्या जातात. वाढत्या संपन्नतेमुळे स्त्रियांच्या एका पिढीवर अधिक बंधने येतात; स्वातंत्र्याच्या कक्षा वाढल्या तर त्या पुढच्या पिढीत वाढतात.
 तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरकामात काहीशी सुकरता आली आहे. दिवाबत्ती, पाणी, दळण, शिवण इत्यादी कामे अधिक सुकर झाली आहेत.
 स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकरीसमाजात स्त्रियांची स्वत:ची अशी मिळकत असण्याच्या अनेक व्यवस्था होत्या. दूध, शेळ्या, कोंबड्या, अंडी, माळवे इत्यादींची मिळकत बायकाच करीत आणि ठेवीत. या साऱ्या पद्धती जवळजवळ नष्ट झाल्या आहेत.
 शेतकरी समाजातील स्त्रियांजवळील दागिन्यांचा डबा जवळजवळ नाहीसा झाला आहे. बहुसंख्य स्त्रियांकडील कपडेलत्ते आणि भांडीकुंडी, घड्याळ, प्रसाधने यांचे प्रमाण वाढले आहे.
 घरधन्यास दारू किंवा तत्सम व्यसन नसेल तर घरसामान, कपडालत्ता, खाणेपिणे, मुलांचे शिक्षण, करमणूक, प्रवास यांवर मिळकतीचा अधिक भाग खर्च होतो.
 लग्नाचे वय वाढत आहे पण, अठरा वर्षांपूर्वीची लग्नं सरसहा होतातच. ग्रामीण समाजाततरी कायदेशीर घटस्फोट, पुनर्विवाह यांचे प्रमाण वाढलेले नाही.
 विवाहबाह्य अपत्यांची सामाजिक मान्यता अजिबात सुधारलेली नाही.
 २. इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडातील स्त्री
 स्वातंत्र्यानंतर घडून आलेल्या बदलांची तपासणी इतिहासाच्या संदर्भात केली पाहिजे. शिवाजीने तोरणा किल्ला १६४६ साली घेतला; त्यानंतर पन्नास वर्षांनी स्वराज्याची पुरी वाताहत झाली. म्हणून काही शिवाजीचे स्वराज्य अल्पजीवी आणि साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित होते असा उपहास करणे योग्य होणार नाही.
 या अभ्यासासाठी इतिहासाचे
 १) मुसलमानपूर्व (इ.स. १२०० पूर्वी),
 २) मुसलमानी साम्राज्य (१३वे ते १७वे शतक),
 ३) पेशवाई (१८वे शतक),
 ४) इंग्रजी अंमल (१९वे व २०वे शतक) आणि
 ५) स्वातंत्र्योत्तर काळ

 असे पाच विभाग पाडता येतील.

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५८