पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'चूल आणि मूल' यांचे ओझे केवळ सार्वजनिक रसोडे आणि पाळणाघरे काढून संपून जाईल ही कल्पना त्याही वेळी पटली नव्हती. पण, मार्क्सवादाच्या वैश्विक दृष्टीचा (World View) प्रभाव इतका दांडगा होता की, खासगी मालमत्तेच्या उगमामुळे स्त्रिया गुलाम झाल्या ही कल्पनाच मुळी एखाद्या प्रचंड लाटेप्रमाणे पायापासून उचलून घेऊन वाहवत नेणारी होती.
 एंगल्सच्या सिद्धांताला पर्याय उभा करणे यासाठी लागणारा व्यासंग नव्हता, नव्या व्यासंगासाठी शेतकरी आंदोलनाच्या धुमश्चक्रीत सवड नव्हती, याखेरीज आणखी एक मोठी अडचण होती.
 शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र विवरून सांगताना एक सिद्धांत मांडला होता. स्त्रियांच्या हातातील स्फ्य् नावाच्या दांडक्याने जमिनीच्या पृष्ठभागावर अगदी उथळ उथळ चिरा पाडून आणि त्यांत बी टाकून आदि-शेतीची सुरुवात झाली. माणसाच्या रानटी अवस्थेत माणसांच्या टोळ्या शिकार आणि कंदमुळे यांवर जगत असताना पुरुषांनी दिवसभर रानावनांत फिरून जमा केलेल्या अन्नाची वाटणी करणे ही जबाबदारी टोळीतील स्त्रियांकडे होती. वाटणारणीच्या वाट्याला काहीच वाटा राहिला नाही म्हणजे आसपासच्या हिरवळीत सापडणारे काही दाणे खाल्ल्यास पोट भरायला मदत होते हे स्त्रीने अनुभवले होते. हेच दाणे जमिनीत पडले तर त्यांतून गुणाकार श्रेणीने नवे दाणे तयार होतात हेही तिने पाहिले होते. त्यातूनच स्फ्य्-शेतीचा उगम झाला, तिची प्रभूता स्त्रीकडे.
 अन्नधान्याचे वरकड उत्पादन
 काही काळाने माणसाने बैलाला वेसण घातली. बैलाकडून अनेक कामे करून घेता येतात हे पाहिल्यानंतर बैलाच्या उपयोगाची आणखी एक शक्यता जाणवली. जंगलात, वनात फिरताना पुरेशी शिकार मिळेच असे नाही; कधीकधी हात हलवीत परत यावे लागे. कंदमुळांनी पोट भरणार ते किती? अन्नाचा तुटवडा असला म्हणजे बाया सभोवतालचे दाणे खातात, ते मिळण्याची काही शाश्वती होती म्हणून पुरुष आणि बैल शेतीला लागले आणि इतिहासाला विलक्षण कलाटणी मिळाली.

 सगळीच जमीन तशी त्या वेळी जीवनपोषक द्रव्यांनी मुसमुसलेली होती. बैलांना जोडून नांगरट केली आणि पृष्ठभागाच्या थोडे खाली बी टाकले तर पृथ्वी, दोन्ही हातांनी घेववणार नाही असे उदंड पीक देते आणि 'दोन हातांनी घेशील किती आणि एका तोंडाने खाशील किती?' अशी समस्या माणसासमोर उभी राहिली. बैलाच्या कष्टांनी माणसाच्या गरजेपेक्षा अधिक पीक तयार होऊ लागले. भाकऱ्या खा. धान्य आंबवून तयार होणारे पेय मजेशीर, पाहिजे तितके

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५