पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नऊ


स्त्रियांच्या प्रश्नांची फूटपट्टी




 गेल्या पन्नास वर्षांच्या, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात, स्त्रियांच्या दृष्टीने काय काय बदल घडून आले याचे मोजमाप काही निश्चित फूटपट्टीने व्हायला पाहिजे. ही फूटपट्टी चांदवड अधिवेशनाच्या शिदोरीनेच दिलेली आहे.
 यासंबंधी मोजमाप करणारे अभ्यासक आणि स्त्री-चळवळीचे नेते एकाच प्रश्नावर भर देतात. समाजातील किंवा कुटुंबाची संपन्नता वाढली तर या संपन्नतेचा यथायोग्य वाटा स्त्रियांपर्यंत पोहोचतो काय? का, केवळ स्त्री म्हणून तिचा हक्क डावलला जातो काय? पण या खेरीज, इतरही अनेक व्यवस्थांचा फायदा स्त्रियांपर्यंत पोहोचतो किंवा नाही याचेही मोजमाप करणे आवश्यक आहे. स्त्रिया शिक्षण, आरोग्य, प्रवास, संचार इत्यादी व्यवस्थांचा पुरुषांच्या तुलनने किती प्रमाणात उपयोग करतात याचे मोजमापही खूप बोलके होईल.
 पण, स्त्रीमुक्तीचे सर्वांत महत्त्वाचे मोजमाप लिंगभेदावर आधारलेली सामाजिक आणि कौटुंबिक श्रमविभागणी ही बेडी कितपत सुटली आहे हे आहे. मुलींची गर्भहत्या व स्त्रीबालक जन्मल्यानंतर त्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गाने हत्या या बाबतीत काही लक्षणीय फरक पडला आहे का? मुलगी आहे व लग्न करून चूलमूलच सांभाळणार आहे अश्या कल्पनेने तिच्यावर किती संस्कार केले जातात? आणि 'चूलमूल'च्या बाहेरील जगात उतरण्यासाठी तिची किती तयारी केली जाते? स्त्री आहे म्हणून ती पुरुषांच्या तुलनेने अधिक असुरक्षित बनते काय? गर्भधारणा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आणि शक्यता तिला किती प्रमाणात उपलब्ध होतात? आणि संसार नासल्यास तिला पूर्वीप्रमाणेच जगता यावे यासाठी मालमत्ता, मिळकत, पोटगी आणि संरक्षण यांची व्यवस्था आहे काय? याही फूटपट्ट्या अशा मोजमापासाठी वापरणे आवश्यक आहे.

 या फूटपट्ट्या वापरायच्या म्हणजे त्यासाठी प्रचंड आणि व्यापक संख्याशास्त्रीय अभ्यास सुरू करावे लागतील आणि सातत्याने चालू ठेवावे लागतील. आजपासून

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५६