पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आठ


चांदवड - जाहीरनामा व शपथ



 आम्ही,
 दिनांक १० नोव्हेंबर १९८६ रोजी, अहिल्याबाई होळकरांचे चांदवड येथे एकत्र आलेल्या लाखावर स्त्रिया, काही शहरी, पण बहुसंख्य खेड्यापाड्यांतून आलेल्या, थोड्या शिकलेल्या पण बहुतेक पाटीसुद्धा न पाहिलेल्या, जवळजवळ सगळ्या शेतात किंवा इतरत्र राबणाऱ्या कष्टकरी बाया, लहानथोर, भिन्नभिन्न जातींच्या, वेगवेगळ्या धर्मांच्या. थोडक्यात भारतीय स्त्रीजीवनाच्या यथार्थ प्रतिनिधी.
 जाहीर करतो की,
 आम्ही माणसे आहोत, इतर कोणाच्याही बरोबरीने माणसे आहोत आणि आम्हाला माणूस म्हणूनच वागविले गेले पाहिजे,
 आमची गुणवत्ता लक्षात घेतली जावी; जन्माच्या अपघाताने ठरणारे विशेष-जात, वर्ण, धर्म, भाषा, संपत्ती नाही आणि लिंगभेद तर नाहीच नाही
 आणि शपथ घेतो की,
 आमचे माणूसपण हिरावणारी हजारो वर्षांची बंधने झुगारून देत आहोत,
 युगायुगांची दुःखे, अत्याचार, परवशता, अपमान आणि शोषण यातून आम्ही मुक्त होत आहोत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे, आमची वैरिणी आमच्याच मनातली भीती आम्ही गाडून टाकीत आहोत; त्याचबरोबर, पुरुषांचीही त्यांना मिरवाव्या लागणाऱ्या खोट्या पुरुषीपणाच्या मुखवट्याच्या जाचातून सुटका करण्याचा आमचा निश्चय आहे.
 पुरुषांना याची जाणीव असो वा नसो स्त्रियांच्या बेड्या या त्यांचेही दुर्दैव आहे.
 स्त्रीला तिच्या निसर्गसिद्ध भूमिकेतून ढळविले की पुरुषही स्व-भावाला पारखा होतो.

 स्त्रीची मूर्ती हीन-दीनतेची झाली की पुरुष रुपात विक्राळ विदुषकीपणा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५२