पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासनव्यवस्था मजबूत करू पाहतात.
 गेली शंभरदीडशे वर्षे मनुष्यजातीला समाजवादाच्या भानामतीने ग्रासले होते. कळपशाहीचा बोलबाला होता. कोणी वर्गाचे महत्त्व सांगत होता, कोणी धर्माचे; कोणी जातीचे, कोणी टोळीचे. व्यक्ती क:पदार्थ आहे, राष्ट्र मोठे आहे, वर्ग मोठा आहे ; समूहासाठी व्यक्तीने आनंदाने स्वतःचे बलिदान करावे, समर्पण करावे यातच व्यक्तीचा परमार्थ आहे असे मांडले जात होते. या फेऱ्यात, दुर्दैवाने, शेतकरी महिला आघाडीव्यतिरिक्त सारी महिला चळवळ सापडली, ती समूहवादी झाली, शासनसंस्था आणि कायदेकानूंच्या आधाराने स्त्रियांच्या दुःखाचे भांडवल करून काही मुखंडींची करिअर जोपासण्याकडे ती वळली. बहुतेक स्त्रीसंस्थांचे कामकाज आणि साहित्य पाहिले तर स्त्री-चळवळीला लागलेले कळपवादाचे ग्रहण स्पष्ट होते. बेजिंग येथे भरलेल्या जागतिक महिला परिषदेच्या जाहीरनाम्यात करिअरवादी महिला मुखंडींनी महिला चळवळीचे केलेले अपहरण उघड दिसून येते.
 समूहवादाचा आता जागतिक ऐतिहासिक पराभव होत आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचे, उद्योजकतेचे नवे युग येत आहे. स्वतंत्रतावादाची मांडणी सतराव्या शतकापासून अनेक विचारवंतांनी केली. स्त्रीप्रश्नाची मांडणी स्वतंत्रतावादाच्या आधाराने करण्याची कामगिरी शेतकरी महिला आघाडीने पार पाडली.
 सर्वत्र समूहवादाचा गलबला चालू असताना शेतकरी महिला आघाडीने ही हिम्मत दाखविली. स्वतंत्रतावादाच्या विचाराची आता पहाट येत आहे, शेतकरी महिला आघाडीने मांडलेल्या विचारांचा आता विजय होतो आहे. आपल्या देशातील अर्थव्यवस्था लुटालुटीची राहाणार नाही आणि नव्या व्यवस्थेत सर्वोच्च प्राधान्य व्यक्तीला राहील, शासनसंस्थेला नाही यासंबंधी विचार करणे, स्वत:ची खात्री करून घेणे, इतरांना पटविणे आणि आवश्यक तर या कामासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवणे हे शेतकरी महिला आघाडीस आणि आघाडीतील प्रत्येक बाईस करावे लागणार आहे.

(शेतकरी संघटक १९९७)

■ ■

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १५१