पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाडाव झाला, एवढेच नाही तर शासन या संस्थेच्या उपयुक्ततेबद्दलच मोठी प्रश्नचिन्हे उभी राहिली आणि स्त्रीआंदोलनाची स्थिती बुडत्या जहाजात चढून बसल्यासारखी झाली.


 ३. शेतकरी महिला आघाडी
 सेवाग्रामची 'जनसंसद'
 भारतभरच्या शेतकरी संघटनांनी ३० जानेवारी १९९८ रोजी सेवाग्राम मुक्कामी स्वतंत्र्याचा ताळेबंद मांडण्याचा कार्यक्रम ठरविला आहे. स्वातंत्र्य मिळाले तरी देश अधिकाधिक घसरणीसच का लागला या प्रश्नावरील चर्चा सेवाग्राम येथे केली जाईल. या चर्चेत भाग घेणारे सारे काही शेतकरी समाजातीलच असतील असे नाही; विविध क्षेत्रांतील विचारवंत आणि कार्यकर्ती मंडळीही या विचारमंथनाच्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. अशा सर्वांना आवर्जून निमंत्रण दिले जात आहे. देशाच्या पन्नास वर्षांच्या कालखंडाच्या जमाखर्च मांडणारे सारे काही पुरुषच असतील असेही नाही, त्यात भाग घेणाऱ्यांत मोठ्या प्रमाणात स्त्रियाही असतील. देशाच्या घसरगुंडीचे कारण तो 'एकमय लोक' या अर्थी राष्ट्र (Nation) झाला नाही; स्वातंत्र्य मिळाले ; एक राष्ट्रगीत, एक राष्ट्रध्वज, एक संविधान, एक पंतप्रधान झाले तरी राष्ट्र एकरूप झालेच नाही; इंडिया भारताचे शोषण करू लागली; गोऱ्या इंग्रजांचे राज्य जाऊन काळ्या इंग्रजांचे राज्य आले; कष्टकरी उत्पादकांचे स्वराज्य प्रस्थापित होण्याऐवजी ऐतखाऊ बांडगुळांचे वर्चस्व तयार झाले. शेतकरी संघटनेची या विषयीची मांडणी ही थोडक्यात अशी आहे. ही मांडणी शेतकरी संघटनेचे पुरुष कार्यकर्ते करतील तसेच, शेतकरी संघटनेच्या बायाही करतील. ही मांडणी बाया करतील तेव्हा त्या शेतकरी म्हणून बोलत असतील, नागरिक म्हणून बोलत असतील; महिला म्हणून नाही.

 पुरुषांच्या भूमिकेत असा काही प्रकार नाही. पुरुषांचे वर्चस्व असल्यामुळे शेतकरी/नागरिक या नात्याने पुरुष बोलतात त्यात त्यांचे पुरुष म्हणून विचारही सामावलेले असतात. शेतकरी म्हणून एक विचार आणि शेतकरी पुरुष म्हणून त्यासोबत दुसरी काही मांडणी करणे त्यांच्या बाबतीत आवश्यक नसते. स्त्रियांची गोष्ट वेगळी आहे. शेतकरी/नागरिक म्हणून शेतीच्या आणि देशाच्या विकासाच्या प्रश्नांत त्यांना स्वारस्य आहे. उदाहरणार्थ, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे साऱ्या शेतकरी बायांचेही मत आहे. पण, शेतीमालाला भाव मिळाला आणि त्यामुळे तिचे दुःख कमी न होता अधिकच वाढले तर काय याही प्रश्नाची

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४६