पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्या संकल्पना आणि शब्दभांडाराची आवश्यकता होती. एक पर्यायी संदर्भरेषा त्यासाठी तयार करणे आवश्यक होते. दुसऱ्या पिढीतील विदुषींना स्त्रीप्रश्नासंबंधी नवी संदर्भरेषा तयार करण्यात अपयश आले. त्यांची तेवढी कुवतही नव्हती आणि जिद्दही नव्हती. परिणाम असा झाला की, पुरुषजगात शोषक-शोषितांच्या संबंधाने जे काही सिद्धांत प्रचलित होते त्यांच्याच साच्यात स्त्रीप्रश्न मारून मुटकून बसविण्यात आला. पहिल्या पिढीतील स्त्री-अभ्यासकांनी स्त्रीप्रश्नाच्या आधारे मार्क्सवादाच्या, विशेषतः वर्गविग्रहाच्या कल्पनेच्या धांदोट्या केल्या, तर दुसऱ्या पिढीतील त्यांच्या लेकींनी मार्क्सवादाच्या आधारेच पुरुषसत्ताक व्यवस्था विरुद्ध शोषित स्त्रिया अशी वर्गवादी मांडणी केली. अनेक ठिकाणी स्त्रियांची चळवळ ही डाव्या चळवळीचा महत्त्वाचा भाग बनली. नोकरदार, पगारी आणि दिखावू शब्दकौशल्य अंगी बाणवलेल्या स्त्रियांच्या हाती ही चळवळ गेली.
 आंदोलनाची दुर्दशा
 वेगवेगळ्या क्षेत्रांत आपापली कर्तबगारी दाखविणाऱ्या स्त्रिया होत्या. कोणी वकील होत्या, कोणी डॉक्टर, कोणी लष्करात जात होत्या तर कोणी वैमानिक बनत होत्या; कोणी साहसाची कामे करीत होत्या तर कोणी कलाक्षेत्रात चमकत होत्या. अनेक उद्योजक महिलांनी कारखानदारी, व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतही आपल्या स्त्रीपणाचा कोणताही आधार न घेता मोठी कामगिरी करून दाखविली. साऱ्या स्त्री-जातीस ललामभूत असलेल्या या दुर्गा स्त्री-चळवळीपासून दूर झाल्या आणि स्त्रीचळवळ वावदूक मुखंडींच्या हाती गेली.

 डाव्या विचारांचा प्रभाव, नोकरदार स्त्रियांचे नेतृत्व आणि सरकारी तिजोरीतून मिळणाऱ्या निधींच्या आधाराने चालणाऱ्या परिसंवाद-परिषदा असले कार्यक्रम यांना स्त्रीआंदोलनात महत्त्वाचे स्थान मिळाले. परिणामतः, सारे महिलाआंदोलन शासनापेक्षी बनले. स्त्रियांचे काही भले व्हायचे असेल तर ते शासनाने केलेल्या कायद्यांमुळे, शासनाने चालविलेल्या प्रकल्पांमुळे, शासनाने दिलेल्या साधनसंपत्तीमुळे होईल अशी परिस्थिती झाली आणि स्त्रीआंदोलनाचे प्राथमिक उद्दिष्टच बदलून गेले. समाज कसाही असो, सरकार कसेही असो त्या सत्तेत स्त्रियांचा वाटा असला पाहिजे अशी 'सक्षमीकरणा'ची भाषा चालू झाली. डाव्या चळवळीच्या प्रभावाबरोबरच मागासवर्गीयांच्या चळवळीला सक्षमीकरणाचे वळण मिळालेले होते ; स्त्रीचळवळीनेही ते बिनाचौकशी स्वीकारले. शासनाच्या आधाराने महिला आंदोलनाची उभारणी होत असताना समाजवादी रशियाचा

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४५