पान:चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न (Chandvadchi Shidori Striyancha Prashna).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्रांतील नवनव्या निष्कर्षांच्या प्रकाशात स्त्रीप्रश्नाची तपासणी करणे अशा संशोधनातही अनेक विदुषी काम करीत आहेत. स्त्रियांचा प्रश्न हा अनेक संस्थांत, विश्वविद्यालयांत अभ्यासाचा स्वतंत्र विषय म्हणून मान्यताप्राप्त झाला आहे. त्यामुळे स्त्रियांच्या परिषदा भरविणे, परिसंवाद घडवून आणणे हे काम गल्लीपासून दिल्लीपर्यंतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रचंड जोमाने चालू आहे. महिला कार्यकर्त्या परिसंवादांच्या राज्यविस्तारात मान्यता पावतात, मग हळूहळू राष्ट्रीय पातळीवर त्या परिसंवाद करू लागतात आणि शेवटची पायरी म्हणजे, वर्षातून दोनचार वेळा वेगवेगळ्या देशांत घडणाऱ्या परिसंवादांतील जागाही भूषवू लागतात. महिला चळवळीतील कार्यकर्त्यांचे या दृष्टीने तीन संच बनतात : आगगाडीसंच, विमानसंच आणि जेटसंच.
 स्त्रीमुक्ती आंदोलनाने काय मिळविले, काय गमावले यावर मतभेद असू शकतील; परंतु, या आंदोलनाने वैचारिक जगास जे प्रचंड योगदान दिले ते कोणी नाकारू शकणार नाही. 'एंगल्स'चा 'स्त्री-दास्याचा सिद्धांत' वर्षानुवर्षे सर्वमान्य होता. महिला आंदोलनाने तो रद्दबातल ठरविला; वर्गविग्रहाच्या सिद्धांतालाच सुरुंग लावला. शेतकरी विचारांइतकेच स्त्रीमुक्तीच्या विचारांनीही साम्यवादी दृष्टिकोनाला कालबाह्य ठरविले आहे. आंदोलने अनेक झाली, त्याबरोबर महिला विचारवंतांनी व्यासंग, अभ्यास, अनुभवांची तरलता आणि प्रतिभेची झेप दाखविली. त्यानेच स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या असल्याच तर काकणभर सरसच आहेत हे स्पष्ट दाखवून दिले. स्त्रीचळवळीतील अभ्यासकांचा एक सुवर्णकाळ होऊन गेला. या पहिल्या पिढीतील विदुषींनी विलक्षण अडचणींना तोंड देऊन अभ्यास केले, निष्कर्ष काढले आणि ते निर्धाराने मांडले.
 .... आणि 'गवसे ही
 दुर्दैवाने, त्या नंतरच्या पिढीत या अभ्यासांना उतरती कळा लागली. 'स्त्रीविषयक प्रश्नांचा अभ्यास' याला एक क्षेत्र म्हणून मान्यता मिळाली, या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती आणि पगारी जागा तयार झाल्या, मुबलक प्रमाणावर निधी उपलब्ध होऊ लागले, मोठमोठ्या संस्था उभ्या राहू लागल्या आणि पार्किन्सनच्या नियमाप्रमाणे खराखुरा अभ्यास संपला. विद्वत्तेचे अवडंबर आणि शब्दजंजाळ उभारणाऱ्या विदुषी आपल्या अभागी बहिणींच्या दुःखाचे भांडवल करत आपली करिअर बनवू लागल्या.

 स्त्रीप्रश्नाविषयीची खरी कळकळ ओसरू लागली, ती एक 'करिअर' बनली. याचे दोन मोठे गंभीर परिणाम झाले. स्त्रीप्रश्नाचे आकलन करण्यासाठी अगदी

चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न / १४४